भूमिअधिग्रहणासह काही मुद्दय़ांवर सरकार व संघटनांमध्ये मतभेद असल्याची कबुली भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर राव यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली. जातिवादासह सर्व वादांपलीकडे जाऊन जनतेने भाजपला मतदान केले. लाट आली आणि गेली, असे व्हायला नको. त्यामुळे पक्षाने सदस्यता अभियान घेतले. १० कोटीचे लक्ष्य असताना सुमारे ११ कोटी सदस्य झाले, पण खरेच हे सदस्य झाले आहेत काय? हे पाहण्यासाठी महासंपर्क अभियान पूर्ण झाले, असे त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील ‘व्यापम’मध्ये घोटाळा झाला. या संदर्भात तुम्हाला जे वाटते ते मलाही वाटत आहे. एवढे मृत्यू कसे होतात, असा प्रश्न या प्रकरणी तपासाची जबाबदारी असलेल्या तपास यंत्रणेला आणि त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या न्यायालयीन यंत्रणेलाही पडला पाहिजे. या दोन्ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे त्याबद्दल बोलणे योग्य होणार नाही, असे मुरलीधर राव यांनी स्पष्ट केले. पक्षाचे ध्येय, पंडित दीनदयाल उपाध्याय, वसंतराव भागवत आदी पक्षांच्या विविध नेत्यांची ओळख करून दिली जाईल. त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकास, माध्यम व्यवस्थापन, राजकीय कौशल्य आदी विषय शिकविले जाणार असून विविध भाषांमध्ये साहित्य तयार होत आहे. माध्यमांसोबत संपर्क आणि संवाद कसा साधावा, माध्यमांतर्गत विविध अंतर्गत प्रवाह आदी सर्व बाबींची माहिती दिली जाणार आहे. माजी प्र-कुलगुरू योगानंद काळे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, प्रा. श्रीकांत देशपांडे, डॉ. कीर्ती अजमेरा, माजी महापौर अर्चना डेहनकर, धर्मपाल मेश्राम, प्रभाकर येवले पत्रकार परिषदेला उपस्थित होते.