चौकशी करून कारवाई केली जाणार

नागपूर : पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला ब्रह्मोस मिसाईलची संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वैज्ञानिक निशांत अग्रवाल याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडण्यात येत असून तसे संदेश फेसबुकवर फिरत आहेत. त्याविरुद्ध स्वयंसेवक सागर कोतवालीवाले व इतर पंधरा जणांनी बालरतन फुले यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रार अर्जावर चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

डीआरडीओच्या नागपुरातील ब्रह्मोस एअरोस्पेस या कंपनीत वरिष्ठ सिस्टीम अधिकारी असलेल्या निशांतने ब्रह्मोस मिसाईलचे कोडिंग व इतर अतिसंवेदनशील दस्तावेज घरी आणून स्वत:च्या लॅपटॉपमध्ये ठेवले होते. दरम्यान, आयएसआयने हनी ट्रॅपद्वारा फेसबुकवरून नेहा शर्मा व पूजा रंजन या बनावट नावांनी निशांतला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली व चॅटिंगच्या माध्यमातून जवळीक साधली. त्यानंतर त्याच्याकडून संरक्षण क्षेत्रातील सुपरसोनिक कंपनीविषयी संवेदनशील माहिती मिळवून घेतली. या प्रकरणात लखनौ दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर एटीएसच्या मदतीने सोमवारी पहाटे त्याच्या घरावर छापा टाकून  त्याला अटक करण्यात आली. हा निशांत संघाचा प्रतिनिधी आहे, अशी  पोस्ट बालरतन फुले यांनी  फेसबुकवर टाकली. ती पोस्ट सर्वत्र फिरत असून निशांतचा संघाशी काहीएक संबंध नाही. मात्र, फुले याच्या पोस्टमुळे संघाची बदनामी होत असल्याची तक्रार संघ स्वयंसेवक सागर कोतवालीवाले व इतर पंधरा जणांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. यासंदर्भात कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  तक्रारीवर चौकशी सुरू आहे. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल. दरम्यान, गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना शुक्रवारी निवेदन सादर करण्यात येईल, असे कोतवालीवाले यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.