नेत्यांनी स्वत:चे अहंकार बाजूला ठेवून व्यापक हिंदुत्वासाठी युती करावी, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना दिल्यानंतर उशिरा रात्रीपर्यंत पुन्हा जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या. औरंगाबाद महापालिकेत भाजप-शिवसेनेच्या युतीसंदर्भात बोलणी सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांशी रविवारी चर्चा केली. शहरातील बन्सीलाल नगर येथे झालेल्या या चर्चेदरम्यान भाजपच्या नेत्यांना कानपिचक्याही देण्यात आल्या. शहराच्या विकासासाठी काम करायचे आहे की नाही, या शब्दात सुनावण्यात आले. व्यापक हितासाठी दोन्ही पक्ष आवश्यक असल्याने युती कराच, असा सल्ला देण्यात आला. त्यामुळे युती न करण्यासाठी बाह्य़ा सरसावणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी तलवार म्यान केली.
 सेना आणि भाजपच्या नेत्यांनी आज सकाळपासून स्वतंत्र आणि संयुक्त बैठकांचा सपाटा लावला होता. आमदार अतुल सावे, किशनचंद तनवाणी, शहर जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे व शिवेसेनेकडून महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे, अंबादास दानवे आदींनी चर्चा केली. मात्र, कोणता वॉर्ड कोणाला यावरून चर्चेचे घोडे पुढे सरकले नाही. युती होऊ नये अशीच रणनीती दोन्ही बाजूने आखली जात होती.  खासदार चंद्रकांत खैरे यांनी युती व्हावी यासाठी शनिवारी संघाच्या वरिष्ठांशी संपर्क साधला होता. त्यांच्याबरोबर बैठक झाल्याचे त्यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत युती होणार नाही, अशीच चर्चा ज्याच्या-त्याच्या तोंडी होती. रावसाहेब दानवे आल्यानंतर त्यांनी देखील संघातील वरिष्ठांशी चर्चा केली. देवजीभाई पटेल यांच्या निवासस्थानी युतीच्या अनुषंगाने काय भूमिका आहे, याबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यावर युती कराच, असा सल्ला संघाच्या वरिष्ठांनी दिल्याचे सांगण्यात आले.
 देवजीभाई पटेल यांच्या निवासस्थानी चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, वेगवेगळ्या स्तरावर युतीबाबतची बोलणी सुरू आहे. शिवसेनेबरोबर चर्चा करणेही सुरू आहे. त्यामुळे युती तुटली असे वातावरण नाही. तुम्हाला काही वेळात ‘गोड’ बातमी दिली जाईल. बातमीची गोडी नक्की कोणाला लाभदायक? भाजपच्या कार्यकर्त्यांना की युतीच्या हे सांगण्याचे त्यांनी टाळले.  

व्यापक हिंदुत्वासाठी दोन्ही पक्षांमध्ये युती व्हावी, असे वाटते. शंभर टक्के मतदान हा संघाचा नेहमीचा कार्यक्रम आहे. त्यात दोन्ही पक्ष हिंदू हितासाठी काम करत असल्याने त्यांनी निवडणुका एकत्रित लढवाव्यात.
 -देवजीभाई पटेल, रा. स्व. संघाचे पदाधिकारी