रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारला दिलेल्या ‘कानपिचक्यांची’च री संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख अरुणकुमार यांनी येथे ओढली आहे.
औरंगाबाद येथे संघाच्या देवगिरी महासंगम संमेलनात ज्याप्रमाणे मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना सांगितलेली ज्युलियस सीझरची गोष्ट श्रोत्यांच्या भुवया उंचवायला लावणारी ठरली तशीच अरुणकुमार यांनीही केंद्र आणि राज्यात झालेला सत्ताबदल हा कोण्या एका राजकीय पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या करिष्म्याच्या किंवा एखाद्या संघटनेच्या प्रभावाचा परिणाम नाही. लोकांचा रोष निवडणुकीच्या माध्यमातून भ्रष्ट्र व्यवस्था उखडून टाकण्यासाठी मतपेटीतून व्यक्त झाला आहे. संपूर्ण समाजाने या सत्ताबदलात आपले योगदान दिले आहे. सत्तेत झालेला बदल हा तत्कालीन सरकारच्या प्रचंड घोटाळ्यांना आणि प्रचंड अव्यवस्थेला कंटाळलेल्या सर्वसामान्य जनतेने घडवला आहे. या बदलाचे श्रेय कुण्या एका व्यक्ती किंवा पक्षाने घेऊ नये, असाच अरुणकुमार यांच्या भाषणाचा अन्वयार्थ होता.
देशातील सामान्य मतदाराने आणीबाणीला विरोध करून १९७७ मध्ये इंदिरा गांधींचे सरकार उलथून लावले. त्यापूर्वी १९४७ मध्ये ब्रिटिशांचे जुलमी सरकारही याच जनतेने हाकलून लावले. १९४७ चे स्वातंत्र्य आणि १९७७ चे दुसरे स्वातंत्र्य जनतेने प्रस्थापित केले, पण आíथक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय सुरक्षा याबाबतीत क्रांती झाली नाही. देशाला आपल्या प्राचीन परम वैभवाप्रत न्यायचे असेल तर रा.स्व. संघाला समाजाच्या समन्वयातूनच क्रांती करावी लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले. संघाच्या येथे पोस्टल ग्राउंडवर आयोजित भव्य राष्ट्रसाधना संमेलनात दहा हजारावर गणवेशधारी स्वयंसेवकांसमोर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
राजकारण्यांनी देशाला भ्रष्टाचाराच्या गत्रेत टाकून आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेपासून दूर केलेल्या परिस्थितीशी संघाला सामना करायचा आहे. वैभवशाली भारताचे स्वप्न साकारण्यासाठी रा.स्व. संघ कटिबध्द असल्याची ग्वाही यावेळी दिली. संघाचे संस्थापक डॉ. बळीराम हेडगेवार आणि भारतीय इतिहास संकलनास दृष्टी देणाऱ्या बाबासाहेब आपटे यांच्या यवतमाळातील वास्तव्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ‘भारताला आपले सर्व क्षेत्रातील पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी संघ स्थापन झाला आहे. सामजंस्य निर्मिती हा स्वयंसेवकांच्या संघ कार्याचा मूलभूत उद्देश आहे. सत्ताबदलानंतर सत्तेत आलेल्यांनी जनतेच्या इच्छाआकांक्षाची पूर्ती करून भारताची प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांना साजेशी व्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान पेलले पाहिजे’, असे ते म्हणाले
न.मा. जोशी, यवतमाळ