शबरीमला मंदिरात प्रवेश घेण्यावरुन सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले. महिलांना मंदिरात प्रवेश नसल्याची देवस्थानची शेकडो वर्षांची परंपरा आहे. जी समाजाने स्वीकारलेली आहे. अनेक वर्षांपासून हे पाळले जाते. यासाठी कोणीच आंदोलन केले नव्हते, असे म्हणत भागवत यांनी महिलांना मंदिर प्रवेश बंदीचे समर्थन केले.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५० वयोगटातील महिलांनाही शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर केरळमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शबरीमला मंदिर परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरुप आले असून पुरुषांबरोबर अनेक महिलाही मंदिरात प्रवेश करण्यासाठी जात असलेल्या इतर महिलांना रोखत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महिलांना मंदिरात प्रवेश बंदी असावी याचा पुरस्कार केला आहे. त्याचा पुनरूच्चार भागवत यांनी आपल्या भाषणात केला.

मंदिरात महिलांना प्रवेश न देण्याची शेकडो वर्षांची पंरपरा आहे. ही धार्मिक परंपरा विविध राजकीय पक्ष कोट्यवधी भक्तांची श्रद्धा, महिलांचा मोठा वर्गही या नियमांना मानतो, असे भागवत यांनी म्हटले.