राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूर येथील विजयादशमी उत्सवानिमित्त आयोजित पथ संचलनावेळी शहरी नक्षलवादवर भाष्य केले. गेल्या काही दिवसांत शहरी नक्षलवादाचा प्रभाव वाढला आहे. काही दिवसांपासून देशात छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आंदोलने केली जात आहेत. पक्ष मोठा करावा लागतो. त्यामुळे अशी आंदोलने करावी लागतात, हे समजू शकतो. पण ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणारे लोक जेव्हा अशा आंदोलनात उतरतात. तेव्हा ते आंदोलन राहत नाही. आंदोलने पूर्वीही होत. पण अशा स्वरुपाची आंदोलने होत नसत. समाज, सरकार व परंपरांविरोधात नक्षलवाद्यांचे काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

शहरी नक्षलवादाची एक कार्यपद्धत असते. नक्षलवाद हे नेहमीच शहरी राहिले आहे. या लोकांकडून गरीब, आदिवासींचा फायदा घेतला जातो. खोटे बोलणे, द्वेष पसरवण्याचे काम हे नक्षलवादी करतात. देशात फूट पाडण्याचा यांचा हेतू असतो. सोशल मीडियावरुन नक्षलवादाचा प्रचार केला जात आहे. लोकांना भडकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद आदींचा वापर केला जात आहे.