महाराष्ट्रात गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्याकडून भाजपा आयटी सेलशी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्रमोशनसाठी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती असा दावा आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता (आरटीआय) साकेत गोखले यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतल भारतीय निवडणूक आयोगाने सविस्तर अहवाल मागवला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेतली असून याप्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडून आरोपांप्रकऱणी सविस्तर अहवाल मागवला असल्याची माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

साकेत गोखले यांनी एकामागोमाग एक ट्विट करत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. साकेत गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून सोशल मीडिया चालवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली कंपनी तीच आहे ज्यांना भाजपानेही नियुक्त केलं होतं. ही कंपनी भाजपा नेत्याच्या मालकीची आहे”.

साकेत गोखले यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून सोशल मीडिया जाहिरातींवर देण्यात आलेल्या पत्त्याकडेही लक्ष वेधलं आहे. जाहिरातींवर २०२, प्रेसमन हाऊस, विले पार्ले, मुंबई असा पत्ता देण्यात आला आहे. साकेत गोखले यांच्या दाव्यानुसार, हाच पत्ता Signpost India यांच्या नावे होता. या कंपनीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा त्यांचा दावा आहे.

साकेत गोखले यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “२०२ प्रेसमन हाऊस हा पत्ता सोशल सेंट्रल नावाच्या डिजीटल एजन्सीकडूनही वापरण्यात आला होता. ही एजन्सी भारतीय जनता युवा मोर्चाच्या आयटी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक देवांग दवे यांच्या मालकीची आहे”. साकेत गोखले यांनी भाजपा आयटी सेलच्या सदस्याला महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचं सोशल मीडिया हाताळण्याची जबाबदारी का देण्यात आली ? अशी विचारणा केली आहे.

साकेत गोखले यांनी ट्विटरला एकामागोमाग एक अनेक ट्विट केले असून सोशल सेंट्रलचे ग्राहक असणाऱ्यांची यादी शेअर केली आहे. यामध्ये भाजपाशी संलग्न संस्थांचाही समावेश आहे.

साकेत गोखले यांच्या आरोपांवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “स्वतंत्र निवडणूक आयोग पॅनेलकडून या गंभीर प्रकरणाची चौकशी केली जावी. निवडणूक आयोगाच्या डाटाबद्दल काय ? कंपनीची पार्श्वभूमी का तपासण्यात आली नव्हती?”.

दरम्यान इंडिया टुडेशी बोलताना देवांग दवे यांनी सर्व आरोप फेटाळले असून निराधार असल्याचं म्हटलं आहे. आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भाजपाने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.