News Flash

“सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?”; नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत सायकल रॅली काढण्यात आली होती

नाना पटोलेंनी इंधनाच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन दिल्याचे सांगितले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत सायकल रॅली काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप आणि आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल चालवत राज्यपालांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस नेते सायकलवरून राजभवनात गेले होते. यावेळी काँग्रेसतर्फे राज्यपालांना इंधन दरवाढीविरोधात निवेदन देण्यात आलं. दरम्यान या सायकल रॅलीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. काँग्रेसची सायकल रॅली नौटंकी असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर आता नाना पटोलेंनी उत्तर दिलं आहे.

“काँग्रेसने सायकल रॅली काढली ही नौटंकी वाटत असेल तर सामान्य जनतेचं जगणं भाजपाच्या सरकारने मुश्कील केलं आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत का?” असे नाना पटोलेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नाना पटोलेंनी इंधनाच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी, मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत योग्य माहिती पुरवण्याची, महाराष्ट्राला जास्तीत जास्त लसी मिळाव्या यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन दिल्याचे सांगितले. केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर काँग्रेस हे आंदोलन आणखी तीव्र करेल असा इशारा पटोलेंनी यावेळी दिला.

राज्यपालांना भेटण्याआधी नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. “केंद्रात बसलेले मोदी भाजपाचे सरकार या देशाला आर्थिकरित्या कमजोर करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी असतानाही रोज पेट्रोल, डिझेल, सीएनजी सारख्या इंधनाचे दर वाढवण्याचे काम मुद्दाम करत आहेत. अशा वेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आदेशावरुन संपूर्ण देशात आंदोलनं करत आहेत. महाराष्ट्रात १७ तारखेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे” असे नाना पटोले यांनी म्हटले होते.

शरद पवारसाहेब आमच्यावर नाराज नाही

शरद पवारसाहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष्य आहेत. त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. माझा पक्ष वाढवणे माझा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवारसाहेब आमच्यावर नाराज नाही आहेत. भाजपाकडून महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्यासोबत गेलेल नेते पळून जाऊ नयेत म्हणून अशा प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे पटोले म्हणाले. संघटना आणि सरकारमध्ये फरक असतो. सर्वच जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याचा कोणी विरोध करण्याचे कारण नाही असे नाना पटोलेंनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 1:24 pm

Web Title: rubbing salt on the wounds of common people by increasing fuel prices nana patole question to devendra fadnavis abn 97
Next Stories
1 पीकविमा योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ द्या; ठाकरे सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव
2 कोल्हापुरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल
3 “तुम्ही नेतृत्व करा, मी तुमच्यासोबत काम करेन,” फडणवीसांकडून भुजबळांना आश्वासन
Just Now!
X