सोलापूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर आणि सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र प्रभू यांनी आपापल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हाती घेऊन जनसामान्यात विश्वासार्हतेची भावना निर्माण केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी हैदराबाद रस्त्यावरील मुळेगाव तांडय़ावर शहर व ग्रामीण पोलिसांनी संयुक्त धाडी घालून ५० पेक्षा अधिक हातभट्टी दारूच्या भट्टय़ा उद्ध्वस्त केल्या. सायंकाळी दुपारी उशिरापर्यंत ही धडक कारवाई सुरू होती.
या कारवाईत अवैध हातभट्टी दारू तयार करण्यासाठी बेकायदेशीरपणे घेतलेली वीज जोडणी तोडण्यात आली. तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल साठवून ठेवण्यासाठी बांधलेली गोदामेही जेसीपी यंत्राच्या साह्य़ाने जमीनदोस्त करण्यात आली. अलीकडच्या काळात अवैध हातभट्टी दारू भट्टय़ा उद्ध्वस्त करण्याची ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते. या कारवाईमुळे हातभट्टी दारू भट्टय़ा चालविणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
बुधवारी सकाळी सोलापूर शहरातील दोन पोलीस उपायुक्त, सात सहायक पोलीस आयुक्त, १६ पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांसह १९० पोलीस कर्मचारी तसेच सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस निरीक्षक, ७ सहायक पोलीस निरीक्षक व १५ कर्मचारी असा लवाजमा मुळेगाव तांडय़ावर पोहोचला आणि काही क्षणातच तेथे सर्रासपणे चालणाऱ्या हातभट्टी दारूचे कारखाने उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू झाली. विशेष म्हणजे एरव्ही हातभट्टी दारू कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस कुमक आली तर त्यांच्यावर झुंडशाही पद्धतीने दगडफेक करून त्यांना हुसकावून लावण्याचे प्रकार घडतात. परंतु आज प्रथमच पोलिसांचा मोठा फौजफाटा तसेच नवीन पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांचे धोरण लक्षात घेऊन या कारवाईला कोणीही अडथळा आणला नाही. दुपापर्यंत ही कारवाई सुरूच होती. कारवाईत सुमारे ७५ लाखांपेक्षा जास्त माल पकडण्यात आला. या कारवाईत पोलिसांबरोबर महावितरण, वनविभाग, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.
कारवाईत पोलिसांनी तीन जेसीपी यंत्रांच्या साह्य़ाने हातभट्टी तयार करणारा गूळ, रसायन आणि इतर साहित्य ठेवलेले पिंप नष्ट केले. काही ठिकाणी जमिनीत व पिकांमध्ये तसेच विहिरीत दारूचा साठा दडवून ठेवण्यात आला होता. त्याचाही शोध घेण्यात आला. हातभट्टी दारू तयार करण्यासाठी महावितरण कंपनीच्या विद्युत तारांवर चक्क आकडे टाकून तर काही ठिकाणी बेकायदेशीर विद्युत जोडणी करून विजेचा वापर केला जात होता. महावितरणच्या पथकाने ही वीज जोडणी तोडून टाकली. या हातभट्टी दारू निर्मिती कारखाने चालविणारे व त्यासाठी स्वत:च्या जागा उपलब्ध करून देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.
 
 

Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद