पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी दोन वर्षांचा दंडक असणारा नियम मागे घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
एखाद्या पोलीस ठाण्यात दोन वष्रे काम केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याची बदली करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पोलीस शिपाई, हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील कर्मचाऱ्यांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. त्यांच्यासाठी पूर्वीप्रमाणेच पोलीस ठाण्यासाठी सहा वष्रे आणि विभागासाठी १२ वष्रे ही मर्यादा राहणार आहे. अन्य पदावरील कर्मचाऱ्यांना मात्र दोन वर्षांचाच कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार दोन वर्षांत झाल्या तर बदलीच्या ठिकाणी त्यांची फारशी गरसोय होत नाही. मात्र कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शालेय प्रवेशापासून ते निवासस्थानापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील राजकीय स्थितीबाबत बोलताना गृहमंत्री पाटील म्हणाले की धर्मनिरपेक्ष मतांमध्ये विभागणी होऊ नये अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्माचे पालन होत नसल्याच्या तक्रारी सगळय़ाच ठिकाणी आढळून येत आहेत असेही त्यांनी सांगितले.