वसई, विरार, नालासोपाऱ्यात रहिवाशांकडून उल्लंघन

विरार : वसई-विरारमध्ये करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असेले तरी नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत वसई-विरार परिसरात नागरिक मास्क न घालता, सामाजिक दुरीकरणाचे नियम न पाळता सर्रास वावरत आहेत. यामुळे करोना आटोक्यात येण्याऐवजी त्याचा प्रसार होण्याची वाढली आहे.

जुलै महिन्यापासून शासनाने टाळेबंदीत शिथिलता आणून बऱ्याच  गोष्टींत  सवलती दिल्या आहेत. पण त्याचबरोबर नियम पाळण्याची बंधनेसुद्धा घातली आहेत. पण आता मागील काही दिवसांपासून वसई -विरारमध्ये करोनाचे वातावरण नसल्यासारखे चित्र दिसत आहे. कारण शासनाच्या सर्वच नियमांची पायमल्ली सामान्य नागरिक ते व्यापारी, भाजी विक्रे ते, दुकानदार, फेरीवाले, खासगी प्रवासी यंत्रणा करत आहेत.

पावसाळी वातावरण, टाळेबंदीतील सूट आणि गणेशोत्सवातील उत्सवासाठीची संभाव्य गर्दी  पाहता रुग्णसंख्या वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण नागरिक कोणतेही भान न ठेवता घराबाहेर फिरत आहेत. सुरुवातीला वेगाने संसर्ग वाढल्यानंतर पालिकेने पावले उचलल्यामुळे रुग्णसंख्या काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी र्निबध शिथिल करण्यात आले आहेत, मात्र नवीन रुग्णांची संख्या तशाच प्रमाणात वाढत आहे.

त्यात नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. वसई-विरार परिसरांत अद्यापही एकही परिसर करोनामुक्त झाल्याची घोषणा पालिकेने केलेली नाही, मात्र समाजमाध्यमांवर अमुक अमुक परिसर करोनामुक्त झाल्याच्या अफवा नागरिकांमध्ये पसरत आहेत. त्यामुळे निष्काळजी वाढत असल्याने, चित्र अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

नालासोपारा, विरार परिसरांत निष्काळजी

नालासोपारा, विरार या परिसरांत मंडईसह अनेक ठिकाणी पदपथावर फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी र्निजतुकीकरणासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. विक्रे ते मास्क वापरत नाहीत. तसेच संध्याकाळच्या वेळी या पदपथांना जत्रेचे स्वरूप येते. यात नागरिकही सामाजिक दुरीकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यात आता नव्याने कामावर जाणाऱ्यांची भर पडली आहे. यामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात गर्दीची ठिकाणे पुन्हा दिसू लागली आहेत. पालिका काही ठिकाणी कारवाई करत होती, पण आता ती कारवाईसुद्धा मंदावल्याने करोनाचा धोका अधिक वाढला आहे.

महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना वारंवार सूचना तसेच जनजागृती करत आहोत, सर्व प्रभाग सहायक आयुक्तांना अशा ठिकाणी कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत, पण नागरिकांनी स्वत: पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रशासन किती कारवाई करणार?

– संतोष दहिरकर, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका