काँग्रेस आघाडीच्या राज्यकर्त्यांचा सर्व वेळ राजकारणातच खर्च होत आहे. गारपीटग्रस्त शेतक-यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. शेतक-यांच्या मदतीबाबत हालचाली करण्यास त्यांना १५ दिवस लागले अशी टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रताप ढाकणे यांची समजूत काढण्यासाठी तावडे आज येथे आले होते. या धावत्या दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणूक आयोगाने वेळेची जाणीव करून दिल्यानंतर राज्य सरकारला गारपिटीच्या संकटाची जाणीव झाली. ही शेतक-यांची घोर निराशा आहे. राज्यातील गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी, अशा काळात निवडणूक आचारसंहिता आडवी येत नाही. राज्य सरकार तसे सांगत असेल तर ते चुकीचे आहे. आपद्ग्रस्तांना ५० टक्के मदत तातडीने द्या, उर्वरित रक्कम पंचनाम्यानंतर द्या आणि वीज थकबाकीची वसुली तातडीने थांबवा अशा मागण्या तावडे यांनी केल्या.
मनसेच्या कारणावरून राज्यात महायुतीमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता हे तावडे यांनी मान्य केले. ते म्हणाले, ही गोष्टही व्हायला नको होती. परंतु महायुतीतील सामंजस्याने हा मुद्दा आता संपला आहे. महायुतीतील सर्व पक्ष आता एकदिलाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागले आहेत. या एकीतून चुकीचे संदेश पुसून टाकू, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. नगर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, राम शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अभय आगरकर, सुनील रामदासी, गौतम दीक्षित, गीता गिल्डा आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. विधान परिषदेवर पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल कर्डिले यांच्या हस्ते या वेळी तावडे यांचा सत्कार करण्यात आला.