टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्या साडेसातशे व्यक्तींवर कारवाई

बीड : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून अफवा पसरवणे प्रकरणी राज्यात १३५ गुन्हे दाखल झाले असून सर्वाधिक १९ गुन्ह्यांची नोंद बीड जिल्ह्यात झाली. तर प्रशासनाच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही तब्बल साडेसातशे व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा आणि जमावबंदी, टाळेबंदी लागू केली आहे. या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये  साडेसातशे आरोपींविरुद्ध २६३ गुन्हे दाखल झाले आहेत. टाळेबंदी असतानाही काही ठिकाणी दुकाने उघडी ठेवणे, तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे आणि टाळेबंदीच्या कालावधीत रस्त्यावर अनावश्यक फिरणे अशा व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. टाळेबंदीच्या कालावधीमध्ये समाज माध्यमातून जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश , चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी तब्बल २४ जणांविरुद्ध १९ गुन्ह्यंची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे.  समाज माध्यमातून करोना विषाणूच्या अनुषंगाने कोणतीही अफवा किंवा दोन समाजात तेढ निर्माण होऊ न सामाजिक वातावरण दूषित होईल अशा स्वरूपाचे संदेश प्रसारित करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले होते. तरीही समाज माध्यमातून असे संदेश प्रसारित झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या सायबर शाखेकडून समाज माध्यमातील प्रत्येक संदेशावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये करोना विषाणूच्या अनुषंगाने अफवा पसरविल्याप्रकरणी आणि जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी १३५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १९ गुन्ह्यंची नोंद झाली आहे.