शहरात मंगळवारी रात्री जमावाने घातलेल्या धुडगूसप्रकरणी कोतवाली पोलिसांनी ४० ते ५० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यात अनेक फिर्यादी दाखल झाल्या असून चोवीस तासांत केवळ दोघांनाच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून शहरातील तणाव मात्र आता निवळला आहे, मात्र या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे.
अन्यत्र कुठेतरी फेसबुकवर धर्मग्रंथाची विटंबना करण्यात आली, या चर्चेने शहरात मंगळवारी रात्री एका मोठय़ा जमावाने मोठाच धुडगूस घातला. मुख्यत: बाजारपेठांना लक्ष्य करीत या टोळक्याने विनाकारण दहशत पसरवत दुकाने, गाडय़ांवर दगडफेक करून गोंधळ घातला. अचानक सुरू झालेल्या या प्रकाराने शहराच्या मध्यवस्तीत एकच पळापळ झाली. त्यातही अनेक जण जखमी झाले. यासंदर्भात नुकसान झालेल्या व्यापा-यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या असून पोलिसांनी त्यानुसार ४० ते ५० जणांविरुद्ध दंगलीसह अन्य कलमांन्वये गुन्हे दाखल केले असले तरी गेल्या चोवीस तासांत केवळ दोघांनाच अटक करण्यात यश आले आहे. असीफ सलीम शेख (रा. कोठला, नगर) आणि शहजाद गुलाम रसद कुरेशी (रा. झेंडीगेट, नगर) या दोघांचा त्यात समावेश आहे.
या टोळक्याचा हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप व्यापा-यांनी केला असून मुख्यत: दुकानदारांनाच त्यांनी लक्ष्य करून शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. जुन्या कापड बाजारातील तीन ते चार दुकाने, काही वाहनांचे या जमावाने मोठे नुकसान केले. काही दुकानांमध्ये शिरून त्यातील सामानाची तोडफोड करीत मारहाणही करण्यात आली. जुन्या मंगळवार बाजारातील शिंदे यांच्या देशी दारूच्या दुकानात शिरूनही काहींनी मोठे नुकसान केले व येथील कर्मचा-यांनाही मारहाण केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मजीद असीफ खान (रा. जुनी मनपा, नगर) आणि जईद बादशाह खलिफा (रा. पंचपीर चावडी, नगर) या दोघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेचा शहरात सार्वत्रिक निषेध करण्यात येत आहे. या पार्श्र्वभूमीवर बुधवारी सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात शहर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. उपस्थित सर्वांनीच या बैठकीत या घटनेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. शहरात विनाकारण जातीय तणाव निर्माण करण्याचाच प्रयत्न असल्याच्या भावना व्यक्त करून सर्वांनीच नागरिकांना शांततेचे आवाहन केले. महापौर संग्राम जगताप, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले, नगरसेवक गणेश भोसले, कैलास गिरवले, शिवसेनेचे विक्रम राठोड, काँग्रेसचे उबेद शेख, सुभाष गुंदेचा आदी या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान शिवसेनेने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमदार अनिल राठोड आज मुंबईत होते. यांनी या घटनेबाबत जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या समाजकंटकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.