28 January 2021

News Flash

जिगाव प्रकल्पाला गती येणार ?

अतिरिक्त ४९०६.५० कोटींसाठी राजभवनाकडे धाव

जिगाव प्रकल्पासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करताना जलसंपदामंत्री जयंत पाटील व इतर.

प्रबोध देशपांडे

पश्चिम विदर्भात सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी खारपाणपट्टय़ातील महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. गेल्या २४ वर्षांपासून अडखळत सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम आता दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन करण्यात आले. भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी ४९०६.५० कोटींची अतिरिक्त तरतूद आवश्यक आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची जलसंपदामंत्री जयंत पाटील व बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी भेट घेतली. पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ात जलसमृद्धी यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खारपाणपट्टय़ाच्या भागात सिंचनाची सुविधा होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्य़ाच्या नांदुरा तालुक्यात जिगाव प्रकल्पाचे काम गत अडीच दशकांपासून सुरू आहे. विदर्भातील दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात हा प्रकल्प आहे. राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रम व केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेतही प्रकल्पाचा समावेश आहे. निधीसह इतरही अनेक अडचणी आल्याने प्रकल्पाचे काम वेगाने होऊ शकले नाही. प्रकल्पाची एकूण किंमत १३८७४.९४ कोटी रुपयांवर गेली आहे. प्रकल्प धरण बांधकाम, भूसंपादन, पुनर्वसन, उपसा सिंचन योजना व बंदिस्त पाइप वितरण प्रणाली तसेच इतर कामे जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहेत. एप्रिल २०२० अखेपर्यंत ४३७१.५० कोटींचा खर्च झाला. प्रकल्पाची उर्वरित किंमत ९७७५.५९ कोटी असून नियोजनानुसार प्रतिवर्ष सरासरी १९६० कोटी निधीची आवश्यकता भासणार आहे.

दरवर्षी निधी वितरणास वापरल्या जाणाऱ्या सूत्राप्रमाणे निधीचे वाटप होते. या सूत्रामुळे जिगाव प्रकल्पास आवश्यकतेनुसार निधी मिळाला नाही. अत्यल्प निधी उपलब्ध होत असल्याने नियोजनानुसार काम पूर्ण होण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. वास्ततिक नाबार्डकडून जिगाव सिंचन प्रकल्पासाठी कर्ज स्वरूपात ७७६४ कोटींचा निधी मंजूर आहे.

आतापर्यंत त्यातून खर्च वजा होता सुमारे चार हजार कोटींचा निधी उपलब्ध आहे. मात्र, आर्थिक सूत्रामुळे त्याचा वापर करणे शक्य होत नसल्याची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे निधी वाटपाच्या सूत्रांमध्ये बदल करून जिगाव प्रकल्पासाठी विशेष तरतूद म्हणून ४९०६.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्याचे ठरले होते. या वेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, आ.राजेश एकडे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र आदी उपस्थित होते. पश्चिम विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी जिगाव प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी विशेष बाब म्हणून ४९०६.५० कोटी अतिरिक्त निधी लागणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. यावर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

जिगाव सिंचन प्रकल्पाची व्याप्ती मोठी आहे. त्याचा खर्चदेखील अधिक आहे. दरवर्षी साधारणत: १० टक्के त्यामध्ये वाढ होते. सूत्रानुसार मिळणारा निधी अपुरा असल्याने प्रकल्प पूर्ण होणे शक्य नाही. राज्यातील काही मोठे प्रकल्प सूत्राबाहेर काढण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर जिगाव प्रकल्पाला सूत्राबाहेर काढण्याची गरज आहे. तसे झाल्यास प्रकल्पाला नियोजनानुसार निधी प्राप्त होऊन काम आटोक्यात येईल. त्यासाठी राज्यपालांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. शिवाय त्याला अतिरिक्त निधीही लागेल. हे दोन्ही जुळून आल्यास खारपाणपट्टय़ातील बुलढाणा व अकोला जिल्हय़ातील काही भागांत हरितक्रांतीची आशा पल्लवित होईल.

‘प्रकल्पांची माहिती सादर करा’

राज्यातील जलसंपदा प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी काही प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करता येऊ   शकतील काय? याच्याही शक्यता तपासण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. ही शक्यता प्रत्यक्षात आल्यास राज्यातील काही राष्ट्रीय प्रकल्प होतील. राज्यातील पाच हजार कोटी रुपयांवरील पूर्णत्वाकडे पोहोचलेले प्रकल्प व पर्यावरण परवानगी किंवा इतर काही कारणांसाठी प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची माहिती सादर करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.

जिगाव प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्ह्य़ाची सिंचनक्षमता ही १९ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. हा प्रकल्प राज्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल. राज्यपालांनी याबाबत सकारात्मकता दाखविली आहे.

– डॉ. राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री, बुलढाणा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:15 am

Web Title: run to raj bhavan for additional rs 4906 50 crore for jigaon project
Next Stories
1 जिल्ह्य़ात मिरची, भाजीपाला लागवडीवर भर
2 चिकू उत्पादनात प्रचंड घट
3 राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदासाठी मालेगावात चुरस
Just Now!
X