News Flash

“चंद्रकांतदादा, जामीनाबद्दल बोलायचं झालं तर भाजपाचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत”

"तुम्हाला तुमच्या गावची ग्रामपंचायत सुद्धा निवडून आणता आली नाही. कोल्हापूरमध्ये तुम्हाला..."

फाइल फोटो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलीय. पश्चिम बंगालच्या निवडणुकींमध्ये विजय मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांचं कौतुक केल्यानंतर राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना पाटील यांनी त्यांना जामीनावर सुटला आहात असा टोला लगावला होता. त्यावरुनच आता चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना भाजपाचे सर्वच नेते जामीनावर असल्याची आठवण करुन दिलीय.

रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरुन पाटील विरुद्ध भुजबळ या प्रकरणासंदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. या व्हिडीओमध्ये चाकणकर यांनी, “सध्या देशात आणि महाराष्ट्रात करोनामुळे अतिशय वाईट परिस्थिती उद्भवलेली आहे. मात्र आपल्याला याचं काही घेणं देणं नाहीय. त्यामुळे सातत्याने आपण याला महागात पडेल त्याला बघून घेऊ, याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला आत टाका यावर आपण पीएचडी करता करता एमफील पण करायला लागले आहात. पण तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्हाला तुमच्या गावची ग्रामपंचायत सुद्धा निवडून आणता आली नाही. कोल्हापूरमध्ये तुम्हाला तुमच्या विचारांचा महापौर बसवता आला नाही,” असा टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यात मतदारसंघ शोधावा लागल्याचा टोलाही चाकणकर यांनी लगावला आहे. “कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीच्या वेळी आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून आमच्या पुण्यातल्या एका महिलेचा सुरक्षित असा कोथरुड मतदारसंघ निवडावा लागला. या साऱ्याचा आपण शांतपणे विचार करावा असं मला वाटतं,” असं चाकणकर म्हणाल्यात.

तसेच सध्या महाविकास आघाडीने करोनासंदर्भातील कामांना प्राधान्य दिल्याने तुमच्या टीकेकडे कोणी लक्ष देत नसल्याचंही चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांना सांगितलं आहे. “जययुक्त शिवार घोटाळा, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा असे अनेक घोटाळे आहेत ज्याची चौकशी अजून बाकी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये करोनाच्या संकटाचा सामना करुन त्यावर काम करणं, लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं, ही लढाई यशस्वीपणे लढणं जास्त महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील नागरिक आणि महाराष्ट्र आम्हाला महत्वाचा वाटत असल्याने महाविकास आघाडीचं प्राधान्य करोनाविरोधातील कामांना आहे. त्यामुळे आम्ही या इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही,” असं चाकणकर म्हणाल्यात.

“आपण ज्या पद्धतीने भुजबळ यांच्यावर टीका केली, ज्या मग्रुरीमध्ये आपण बोलता ज्या पद्धतीने आपण त्यांना सांगताय की तुम्ही जामीनावर आहात. तर थोडसं मागं वळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तुमचे अनेक नेते जामीनावर आहेत. जामीनावरच बोलायचं झालं तर आपल्याशिवाय इतर सर्वांची बोलती बंद होईल कारण तुमचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत,” असा टोला व्हिडीओच्या शेवटी चाकणकर यांनी लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 4:46 pm

Web Title: rupali chakankar slams chandrakant patil svk 88 scsg 91
Next Stories
1 देश जाणू इच्छित आहे अमित शाह राजीनामा कधी देणार?- नवाब मलिक
2 चंद्रपूर : वनविभागाच्या कार्यालय परिसरात शिरलं अस्वल; इंजेक्शन देऊन करण्यात आलं जेरबंद
3 “त्या पक्षाला उघडं पाडणार”; अदर पूनावाला प्रकरणावरुन आशिष शेलारांचा इशारा
Just Now!
X