राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मिसेस फडणवीस अर्थात अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा. असं त्यांनी अमृता फडणवीस यांना उद्देशुन म्हटलं आहे.

“राघोबादादा पेशवेच्या गादीला आणि समस्त पेशवाईसाठी अपशकून ठरलेल्या आंनदीबाईसारख्या ‘Dicey Creature’ ला भविष्यात कुणी किंमत दिली नाही.त्यामुळे आजच्या आनंदीबाईनी त्यांच्या राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच आपल्या बेताल बोलण्याला लगाम घालावा.” असं चाकणकर यांनी ट्वटि केलं आहे. शिवाय, ट्विटच्या खाली अमृता फडणवीस यांचा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत आणि मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारविरोधात एक ट्विट केलं होतं.

“वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते.” असं अमृत फडणवीस यांनी ट्विट केलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी राज्यपाल दोन राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वागत आहेत हे सुद्धा लोकांच्या नजरेतून सुटत नाहीये अशी टीका केलेली आहे. तसेच, “अमृता फडणवीस यांना एवढंच सांगायचं आहे की, हाच प्रश्न आपण गोव्याच्या ठिकाणी विचारु शकता. त्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे, पण शेवटी कावीळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं,” असा टोला त्यांनी लगावला होता.