News Flash

व्यवसाय कौशल्य प्रशिक्षणासाठी वृद्ध महिलेकडून १५ कोटींची जागा ‘रयत’ला दान!

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रभाव असलेल्या या महिलेने अण्णांप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून हा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर : अनगोळ दाम्पत्याने पुण्यातील १५ कोटी रुपयांची जागा रयत शिक्षण संस्थेला व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी दान केली आहे.

व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण ही आजच्या काळाची असली तरी केवळ गप्पा मारून हे काम व्हायचे नाही. उक्तीला कृतीची जोड असली पाहिजे. असाच कृतिशीलतेचा धडा एका वृद्धेने घालून दिला आहे. पुणे येथील अनगोळ उभयतांनी हडपसर येथील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रभाव असलेल्या या उभयतांनी अण्णांप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून हा निर्णय घेतला. या जागेची किंमत सुमारे १५ कोटी रुपये असून येथे रयत शिक्षण संस्था कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. डॉ. मालती महावीर अनगोळ (वय ८३, रा. कल्याणीनगर, पुणे) यांनी घेतलेला हा निर्णय प्रेरणादायी आहे.

व्यावसायीक कौशल्य केंद्राला अनमोल मदत करण्यामागची कथाही तितकीच रंजक आहे. मालती अनगोळ या मुळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. ऐतवडे खुर्द येथील बाळगोंड पाटील हे त्यांचे वडील अबकारी विभागात अधीक्षक होते. मालतीताईंना सात बहिणी व तीन भाऊ होते. त्या सर्वांत थोरल्या तर कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. साधना झाडबुके या कनिष्ठ आहेत. मुलींच्या शिक्षणाविषयी फारसे गांभीर्याने घेतले न जाण्याचा तो काळ होता. तेव्हा कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने मालतीताई जे. जे. स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समधून पदवीधर होऊन पुढे मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अधिशाखेच्या प्रमुख बनल्या. इतकेच नाही तर स्टेट बँक म्युच्युअल फंडाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पेलली. त्यांचे पती पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्समधील अग्रणी. सौर ऊर्जा प्रकल्पात त्यांना विशेष रुची होती. याबाबतचे तंत्रज्ञान पुढच्या पिढीपर्यंत जावे यासाठी त्यांनी काही अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी हडपसरमधील ही जागा १९९८ साली खरेदी केली होती. पुढे वृद्धापकाळामुळे हे काम पुढे सरकले नाही. त्यावर व्यावसायीक कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एखाद्या नामांकीत संस्थेला ही जागा द्यावी, असे त्यांनी ठरवले.

बहीण झाडबुके यांनी त्यांना ‘रयत’ शिक्षण संस्थेविषयी सुचविले. रयतमध्ये केवळ पारंपरीक शिक्षण दिले जात असावे असा त्यांचा समज होता; परंतू संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील व सोलापूर येथील लक्ष्मी पंपचे मालक संजीव पाटील यांनी अनगोळ कुटुंबास ‘रयत’च्या व्यावसायीक कौशल्य विकासकामाची माहिती दिली. तेव्हा मालतीताई समाधानी पावल्या आणि अवघ्या चार दिवसांत त्यांनी स्वत:च लेखी करारनामा करून जागा संस्थेच्या ताब्यात दिली. संशोधन, नाविन्यता आणि प्रगतीसाठी सहाय्य या तत्त्वावर ‘महावीर व डॉ. मालती अनगोळ कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ या जागेत सुरु होत आहे. कर्मवीर अण्णांची हिरक महोत्सवी पुण्यतिथी व ‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त नुकताच डॉ. मालती अनगोळ यांचा संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे सत्कार करण्यात आला.

दरम्यान, कर्मवीर अण्णांप्रती कृतज्ञता व्यक्त करून डॉ. मालती अनगोळ यांनी तरुण मुलांच्या हाताला व्यवसायाभिमुख काम मिळावे यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्रासाठी ‘रयत’ला ही जागा देताना आनंद होत असल्याचे नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 9:20 pm

Web Title: rupees 15 crores of land donated from old lady to rayat shikshan sanstha for professional skill training
Next Stories
1 पोलिसाचा प्रेयसीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
2 तारापूर एमआयडीसीत वायुगळती; तीन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू
3 Mother’s Day 2019: ‘त्या’ दोन मुलांना ‘आई’ हाक मारायला कधीच नाही मिळणार !
Just Now!
X