महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या प्राथमिक शिक्षकांच्या बलाढय़ संघटनेत पुन्हा फुट पडली आहे. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी संघाच्या नेत्यांमध्ये एकत्रीकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे. राज्य संघातील या फुटीची लागण जिल्हा संघातही झाली आहे.
संघाचे राज्य अध्यक्ष राजाराम वरुटे व संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी परस्परांची पदावरुन हकालपट्टी केली आहे. जिल्हा संघही त्यामुळे आता वरुटे व थोरात या दोन गटांत विभागला गेला आहे एक जिल्हाध्यक्ष संजय शेळके यांनी थोरात यांना पाठिंबा जाहीर केला तर दुसरे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी वरुटे यांना पाठिंबा दिला आहे. शेळके यांच्या मतानुसार राज्य संघाचे अध्यक्ष आता बाळकृष्ण तांबेरे (उस्मानाबाद) आहेत तर नेतेपदी थोरात कायम आहेत. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार राज्य अध्यक्षपदी वरुटे कायम आहेत, त्यांनी संघातुन थोरात यांची हकालपट्टी केली आहे व नेतेपदी नगरचे विष्णुपंत खांदवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य संघाचे आणखी एक नेते, माजी आमदार शिवाजीराव पाटील सध्या अलिप्त व काहीसे निष्क्रिय आहेत. पुर्वी राज्य संघात थोरात व पाटील असे दोन गट होते, त्याची जागा आता वरुटे व थोरात यांनी घेतली आहे. पाटील यांचे काही समर्थक वरुटे यांच्या मागे आहेत. राज्य संघावर वर्चस्व मिळवण्यासाठी पूर्वी थोरात व पाटील यांच्यात दीर्घकाळ संघर्ष सुरु होता, त्याचा परिणाम जिल्हा संघावरही झाला. संघ हा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक समजला जातो. दीड वर्षांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला व थोरात, पाटील यांच्या गटाचे मार्च २०१३ मध्ये एकत्रिकरण घडवून आणले. त्यावेळी वरुटे यांची अध्यक्षपदी तर थोरात यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
आता वरुटे व थोरात या दोन गटांत संघावर वर्चस्व ठेवण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. तत्पूर्वीच नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निमित्ताने जिल्हा संघात फुटीची बिजे रोवली गेली होती. मात्र त्याला झालर राज्य संघातील गटबाजीची होतीच. सेवानिवृत्त शिक्षक विष्णूपंत खांदवे यांचा बँकेतील हस्तक्षेप संघातील काही पदाधिकाऱ्यांना मान्य नसल्यानेही जिल्हा संघात मोठा असंतोष होताच. शेळके यांच्या माहितीनुसार एक आठवडय़ापुर्वी पुण्यात झालेल्या महामंडळात वरुटे यांची हकालपट्टी करण्यात आली व थोरात यांच्या पाठिंब्याने तांबारे यांची अध्यक्षपदी व राज्य संपर्क प्रमुख म्हणून रावसाहेब रोहकले यांची नियुक्ती करण्यात आली व नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यांना ३२ जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा आहे. तर शिंदे यांच्या म्हणन्यानुसार गेल्या गुरुवारी (दि. २८) नगरमध्ये झालेल्या राज्य संघाच्या सभेत वरुटे यांची अध्यक्ष म्हणुन पुन्हा निवड करण्यात आली तर नेतेपदी खांदवे यांची नियुक्ती करण्यात आली व नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. या कार्यकारिणीला माजी आमदार पाटील यांनी तसेच २२ जिल्हाध्यक्ष, ३ मनपा अध्यक्ष व ६ पालिका अध्यक्षांनी पाठिंबा दिल्याचा दावा आहे.