इयत्ता सातवी नापास व्यक्ती एखाद्या कंपनीचा मनुष्यबळ व्यवस्थापक असेल तर बारावी नापास व्यक्ती प्रशासकीय अधिकारी असेल तर ती कंपनी कशी असेल, असे प्रश्न कोणालाही पडू शकतात. बारावी नापास असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे एमबीए अर्थशास्त्र झालेले विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यास येतात असे कोणाला सांगितले तर ते खरे वाटणार नाही. दहावीला तीन वेळा परीक्षा देऊन पास झालेला व केवळ ४२ टक्के गुण असणारा विद्यार्थी पुन्हा प्रथितयश सीए बनला असे सांगितले तर कोणी विश्वास ठेवेल? आपण अडचणीत असताना इतरांना मदत करण्याची भावना जिवंत ठेवणे फार अवघड असते मात्र एकटय़ाने व्यवसाय करण्याऐवजी अधिकाधिक योग्य व्यक्तींना सोबत घेऊन व्यवसाय वाढवावा असे स्वप्न उराशी बाळगून काम करणारे चव्हाण अ‍ॅण्ड गांधी कंपनीचे भागीदार सचिन शिंदे यांनी हे प्रत्यक्षात उतरवून दाखविले आहे.

नुकत्याच झालेल्या सीएच्या परीक्षेत लातूरच्या रेणुकानगर परिसरात राहणारा वीटभट्टीवर काम करणारा मोसीन शेख हा सीए उत्तीर्ण झाला. मोसीन हा सचिन शिंदे यांच्याकडे आर्टिकलशिप करत होता. सचिन शिंदेंची भेट झाली अन् त्यातून ३७ वर्षांचा एक आगळावेगळी व्यक्ती पाहायला मिळाली. लातूर तालुक्यातील हिसोरी गावातील संदिपान शिंदे या शेतकऱ्याचा सचिन हा मुलगा. दहावीपर्यंत लातूरच्या देशी केंद्र विद्यालयात शिक्षण झाले. लवकरात लवकर व्यवसाय करावा असे सचिनच्या मनात होते तर त्याने सीए व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. पुण्यात शिकायला गेल्यानंतर प्रथमश्रेणीत अकरावी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बीकॉमच्या पहिल्या वर्षांत अकाऊंट विषयात १०० गुण मिळाले अन् सचिनला शिकले पाहिजे असे वाटले अन् त्यातून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सचिनने मेहनत घेऊन सीएच्या परीक्षेत पहिल्याच वेळेत यश मिळविले.

लातुरात सीएचा व्यवसाय करायचा असे त्याने ठरवले. व्यवसाय सुरू झाला. दोन वर्षांत विशाल जाधव या तरुण सीएची भेट झाली जो दहावीला तीन वेळा नापास झाला होता व त्यानंतर सहा वष्रे एका कॅसेटच्या दुकानात नोकरी करत विशाल सीए झाला होता. त्याला सोबत घेऊन भागीदारीत व्यवसाय करायचे ठरले. त्यानंतर ज्याचे वडील शहरातील राजीव गांधी चौकात पाणीपुरीचा ठेला चालवतात अशा प्रवीण प्रजापते याची भेट झाली. तोही सीए झाला होता. त्यालाही सोबत घेतले. सध्या सचिनसोबत एकूण सात सीए काम करत आहेत. लातूर, पुणे व दिल्ली अशा तीन ठिकाणी कार्यालये व एकूण कर्मचाऱ्यांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे.

त्यांच्या कार्यालयात मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून काम करणारा अमोल गवळी हा सातवी नापास विद्यार्थी. प्रारंभी शिपायाचे काम त्याने सुरू केले. काम समजून घेत सध्या तो लातूर शाखेतील ४० कर्मचाऱ्यांचे काम पाहतो. तो अतिशय उत्तम व्यवस्थापक म्हणून ओळखला जातो. याच कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी हे बारावी नापास आहेत. संगणकाची ओळख नव्हती. अकाऊंटचे पुरेसे ज्ञान नव्हते. काम करण्याची इच्छा मात्र होती. आज त्यांच्याकडे एमबीए अर्थशास्त्र झालेले विद्यार्थीही प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

मोसीन शेखच्या नशिबी प्रारंभापासूनच संघर्ष होता. आई-वडील दोघेही वीटभट्टीवर काम करणारे. तीन वर्षांचा असतानाच शेजारीच वीटभट्टीवर काम करणाऱ्या मावशी व काकाने मोसीनचा सांभाळ केला. वीटभट्टीवर रहात असल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त मिळणारा मोकळा वेळ हा चिखलमातीत काम करण्यातच गेला. सुट्टी कधी मिळायचीच नाही. ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी चिखलात काम करता येत नसल्याने सुट्टी मिळायची त्यामुळे कधी कंटाळा आला की आभाळाकडे आज पाऊस पडेल का, अशी प्रार्थना मोसीन करत असे. वीटभट्टीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुळ गल्लीतील महात्मा गांधी विद्यालयापर्यंत तो पायी जात असे. दहावीला सकाळी ७.३० ते १२.३० पर्यंतची शाळा. पहाटे पाच ते सहापर्यंत वीटभट्टीवर चिखल तुडवण्याचे काम व शाळेतून परत आल्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत विटा तयार करण्याचे काम करावे लागत असे. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत तो अभ्यास करायचा.

पदवी मिळाल्यानंतर सीए व्हायचे मोसीनने ठरवले होते. २०१२ मध्ये सचिन शिंदे यांच्याकडे त्याने आर्टिकलशिप स्वीकारली. मोसीनकडे पसे नव्हते. भावाचे लग्न ठरले होते व लग्नात त्याला मिळालेली अंगठी त्याने विकली व ते पसे मोसीनला दिले. सचिन शिंदेच्या कार्यालयात चारच दिवस काम केल्यानंतर सचिन शिंदेंनी मोसीनला बोलावले. तू सीए होऊ शकतोस. तुला कसलीही अडचण आली तरी तू मला सांग, मी मदत करेन अन् सीए झाल्यानंतर तू या कंपनीचा भागीदार असशील, असे सांगितले. त्यानंतर अभ्यासासाठी मोसीन २०१५ साली दीड वर्ष पुण्यात गेला.

त्याचे परीक्षा शुल्क व शैक्षणिक खर्चापोटी सचिन शिंदेंनी मदत केली तर अन्य खर्च फारुकने उचलला. फारुक सध्या चाकूरच्या न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे.

आत्मविश्वासावर फुंकर घालण्याची गरज

मोसीनसारखे दहा विद्यार्थी सचिन शिंदंच्या कंपनीत काम करत असून त्या सर्वाना लागेल ती आíथक मदत देण्याचे काम कंपनीमार्फत केले जाते. आपल्याला जेव्हा वडील, तू शीक, म्हणून मागे लागले तेव्हा पशाची भ्रांत नव्हती. अगदी त्याच भावनेने आपण गरजू विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे ही भावना मनात बाळगली. सुदैवाने सर्व भागीदारांनीही ही कल्पना उचलून धरली अन् त्यामुळेच लपलेल्या गुणवत्तेचा शोध घेत काम सुरू असल्याचे सचिन सांगतो. सचिनच्या कंपनीकडे सध्या लातूरच्या बाहेरील अनेक साखर कारखाने, शासकीय कार्यालये, विश्वस्त संस्था यांची कामे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत गुणवत्ता आहे. ती ओळखून त्यांच्यातील आत्मविश्वासावर फुंकर घालण्याची गरज आहे अन् तेवढेच काम आपण करतो, असे सचिन सांगतो. विविध भागात अशी मंडळी उभी राहिली तर समाजातील हरपलेली गुणवत्ता नजरेसमोर येण्यास वेळ लागणार नाही.