घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचे वाटप करण्यासाठी तक्रारकर्त्यांकडून १८०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या भडगाव तालुक्यातील मलगावचे ग्रामसेवक हिरामण सुपडू पाटील आणि शिपाई गणेश सुकदेव सोनार यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून ६८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर निधीपैकी २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. दुसरा २५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी मलगाव ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक हिरामण पाटील यांनी तक्रारकर्त्यांकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर १८०० रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारकर्त्यांकडून हिरामण पाटील यांच्या वतीने शिपाई गणेश सोनार यास लाच घेताना लाचलुपचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.