५०० व १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून हद्दपार करण्यात आल्यावर दहा दिवस उलटूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने शहरी भागाप्रमाणेच जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प होण्यास सुरूवात झाली आहे. दोन हजार रूपयांचे सुटे देण्यास कोणीही तयार होत नसल्याने या नोटेचे करायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाच धोका उत्पन्न झाला आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर प्रारंभी उडालेल्या गोंधळातही नागरिकांना परिस्थितीत दोन ते तीन दिवसात सुधारणा होईल असे वाटत होते. परंतु, दहा दिवस झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. दररोज उठून बँकांपुढे रांगा लावणे एवढे एकच काम सध्या त्यांच्यापुढे उरले आहे. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिकच बिकट आहे. शहरांमध्ये बँकांची संख्या अधिक असल्याने रांगेत उभे राहण्यासाठी नागरिकांपुढे पर्याय उपलब्ध आहे. इगतपुरी, घोटी यासारख्या ग्रामीण भागात एक किंवा दोनच बँका असल्याने नागरिकांचा अधिक हाल होत आहेत. या बँकांमध्ये मुबलक चलन उपलब्ध न झाल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, जुन्या नोटा बदलून देण्यासाठी अथवा पैसे भरणे अथवा काढण्यासाठी कोणत्याही बँकेकडून नियोजन होत नसल्याने वृद्ध, सेवानिवृत्त व महिलांचे हाल होत आहेत. दहाव्या दिवशीही बँकांबाहेर रांगा सकाळपासून कायम होत्या. बँकांमधून दोन हजारच्या नोटा दिल्या जात असल्याने व्यवहारात सुटय़ा पैशांची समस्या उद्भवत आहे. दोन हजार रूपयांचे सुटे कोणीही देण्यास तयार नसल्याने या दोन हजार रूपयांच्या नोटेचे करायचे तरी काय, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. त्याऐवजी १०० रूपयांच्या नोटा बँकांमधून अधिक प्रमाणात द्यावयास हव्यात, अशी मागणी होत आहे. व्यवहारच होत नसल्याने ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प झाले आहे. घोटी शहर तांदूळ निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. दिवाळी संपल्यानंतर तालुक्यातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात भात विRीसाठी घोटी शहरात आणतात. मात्र बाजारातच चलनच नसल्याने तसेच शेतकरीही जुन्या नोटा स्वीकारत नसल्याने भात खरेदी व्यवहार जवळपास बंद झाले आहेत. यामुळे खरीप व बागायती पिकाच्या लागवडी तालुक्यात रखडल्या आहेत. घोटी शहरातील औषधांची दुकाने, पेट्रोल पंपांवरही ५०० रूपयांचे सुटे देण्यात येत नसून त्याऐवजी तितक्या पैशांचे पेट्रोल भरण्यास सांगितले जात आहे.