विधानसभा निवडणुकीच्या मतदानात नगर शहरात आज, बुधवारी दुपापर्यंत उपनगरातून मतदानासाठी केंद्रावर रांगा तर शहराच्या मध्यवर्ती भागात तुरळक प्रतिसाद असे चित्र पाहावयाला मिळाले. दुपारी तीननंतर मात्र शहराच्या मध्यवस्तीतील अनेक केंद्रांवर लांबलचक रांगा लागल्या होत्या. ‘लक्ष्मीदर्शना’चे प्रयोग मात्र भररस्त्यात खुलेआम सुरू होते.
बहुरंगी लढती, मतदार जागृती अभियान, तरुण मतदारांची वाढती संख्या यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी एकूण ११ तास असल्याने मतदारांनी निवांतपणे मतदानाला हजेरी लावली.
मतदानाला सकाळी संमिश्र प्रतिसाद होता. उपनगरात मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या, तर मध्यवर्ती भागातील केंद्रावर अत्यंत तुरळक ये-जा दिसत होती. आगरकर मळय़ातील केंद्र रेल्वे स्टेशनमधील करमणूक केंद्रात होते. तेथे सकाळी ९ वाजता छोटय़ा रांगा होत्या. चाहुराणा बुद्रुक परिसराचे मतदान जानकीबाई आपटे विद्यालयात होते, तेथेही सकाळी ११ वाजता रांगा होत्या. महिलांची संख्या त्यात अधिक होती. प्रोफेसर कॉलनी परिसराचे मतदान समर्थ शाळेत होते, तेथे दुपारी १ पर्यंत ४० टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले होते. गुलमोहोर रस्त्यावरील आनंद विद्यालयाच्या केंद्रावरील सकाळची गर्दी दुपारी एकनंतर ओसरली होती. तेथेही दुपारी एकपर्यंत ४० टक्क्यांवर मतदान गेले होते.
त्या तुलनेत शहराच्या मध्यवर्ती भागातील केंद्रावर तुरळक परिस्थिती होती. अशोकभाऊ फिरोदिया केंद्रावर साडेअकराच्या सुमारास काहीसा शुकशुकाट होता. नालेगाव परिसराचे मतदान असलेल्या कन्या विद्या मंदिरमधील केंद्रावरही अत्यंत तुरळक मतदार होते. अशीच परिस्थिती रेसिडेन्सिअल शाळेच्या व गांधी मैदानातील मरकडेय शाळेच्या केंद्रावर दुपापर्यंत होती. पेमराज सारडा कॉलेजमधील केंद्रावर सिद्धार्थनगर व लालटाकी परिसराचे मतदान होते, तेथे दुपारी दोननंतर मतदार येऊ लागल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुपारी तीन-साडेतीननंतर मध्यवस्तीमधील राष्ट्रीय पाठशाळा, तोफखाना, झेंडीगेट, हातमपुरा, दादा चौधरी शाळा, सारडा विद्यालय या केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यात महिलांची संख्या अधिक होती. या केंद्रावर ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले.
यंत्रांच्या बिघाडामुळे विलंब
मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडल्याने बदलावे लागण्याच्या चार घटना घडल्या. त्यातून धरती चौकातील, युनियन अध्यापक विद्यालयातील १७८ क्रमांकाच्या केंद्रातील मतदानाची प्रक्रिया सकाळी पावणे दहा ते ११.३० अशी तब्बल पावणेदोन तास खंडित झाली होती. त्यामुळे अनेक नागरिक परत जाऊ लागले होते. या विलंबाबद्दल माजी नगरसेवक संजय चोपडा यांची अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमकही घडली. भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयातील केंद्रातही सकाळी ७.३०च्या सुमारास यंत्र बंद पडल्याने मतदान प्रक्रिया अर्धा तास थांबवली गेली होती.
भिंगारमध्ये गोंधळ, पैसेवाटप
टिळक रस्त्यावरील वाडिया पार्कलगतचे मंदिर, हुतात्मा स्मारकाचे आवार, तोफखाना भागाच्या गल्लीबोळांचा परिसर आदी ठिकाणी मतदारांना कार्यकर्ते ‘लक्ष्मीदर्शन’ घडवताना दिसले. भिंगारमध्ये छावणी मंडळाच्या शाळेजवळ मतदारांना पैसे वाटप करताना पोलिसांच्या पथकाने तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून ६८ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. बाळासाहेब रंगनाथ रोहकले, यशवंत पानमळकर व रोहित राजन भुजबळ (तिघेही रा. नागरदेवळे) या तिघांना अटक करण्यात आली. हे तिघे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते. तत्पूर्वी भिंगारमध्येच पैसेवाटपाच्या कारणातून काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. किरकोळ दगडफेक झाली, खुच्र्याची फेकाफेकही रंगली, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले.
कर्मचाऱ्यांची जेवणाची आबाळ
अनेक केंद्रांवरील कर्मचारी दुपारच्या जेवणापासून वंचित राहिले. काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नव्हती. मात्र त्याच वेळी पेमराज सारडा कॉलेजमधील मतदानकेंद्र ८७ हे कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी काही वेळ बंद ठेवल्याचे आढळले.