05 August 2020

News Flash

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड; तुटवडय़ाची भीती

मोठय़ा प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत. नागरिकांनी साठेबाजी करू नये

मंगळवारी रात्री ८ वाजता पंतप्रधानांनी एकवीस दिवसांची देशातील संचारबंदी रात्री १२ नंतर लागू होणार असल्याची घोषणा केल्यानंतर लातूर शहरातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड  उडाली.

भुसार लाईन, गंजगोलाई, विश्वसुपर मार्केट, डीमार्ट, एमार्ट, रिलायन्स यासह दिसेल त्या किराणा मालाच्या दुकानात लोकांनी जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली. पुन्हा वस्तू मिळतील की नाहीत या भीतीने लोकांनी एकवीस दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याची मागणी सुरू केल्याने दुकानदाराची व नोकरांची भंबेरी उडाल्याचे चित्र दिसले.

बुधवारी सकाळी शहरातील विविध भागात पोलीस फिरून लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना किमान तीन फुटाचे अंतर  ठेवावे असे आवाहन करत होते. मात्र मंगळवारी रात्री गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाच्या बाहेर  होती.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शहरातील विश्वसुपर मार्केट, डीमार्ट, ए मार्ट, पुरुषोत्तम मार्केट, रिलायन्स आदी दुकानांना २४ तास सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री हे आदेश काढले असले तरी जास्तीत जास्त लातूरकरांना चार, पाच दिवस पुरवता येईल इतकाच माल शिल्लक आहे. ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन अचानकपणे दुकानदारांनी कृत्रिम भाववाढ केली. खाद्यतेलाच्या किमतीत तब्बल १५ ते २० टक्क्याने अचानकपणे वाढ करण्यात आली.

उपलब्ध गहू केवळ दोन, तीन दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. बाजारातील गहू संपला तर ग्राहकांना देणार काय ? नागपूर, गोंदीया, भंडारा या जिल्हय़ातून तांदूळ बाजारपेठेत येतो. गेल्या तीन दिवसांपासून बाजारपेठेत नवीन माल येत नाही. आहे तो माल विकल्यानंतर पुन्हा ग्राहकांनी मागणी केली तरी तांदूळ देता येणार नाही. भंडारा जिल्हय़ाला लागून असलेल्या छत्तीसगड प्रांतातील राजानंद या गावाहून मोठय़ा प्रमाणात पोहय़ाची आवक होते. दिवसाची सुरुवातच उपीट, पोहे या नाष्टय़ाने होते. पोहेच उपलब्ध नसतील तर खायचे काय ? गुजरात प्रांतातून शेंगदाणे येतात. शेंगदाण्याची आवकही आता बंद झाली आहे. बाजारात उपलब्ध असलेला माल आठवडाभराच्या आत संपेल व बाहेरून माल बाजारपेठेत आला नाहीतर लोकांना जीवनावश्यक वस्तू कशा मिळणार ? असा प्रश्न आहे.

मोठय़ा प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत. नागरिकांनी साठेबाजी करू नये. अकारण गर्दी करू नये असे आवाहन करणे सोपे आहे, मात्र बाजारपेठेत त्या पध्दतीने मालाची उपलब्धता करणे, त्याचे नियाजन करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. कदाचित पुढील चार, पाच दिवसात या व्यवस्था लागतील मात्र तोपर्यंत नागरिकांची होणारी अडचण कशी दूर करणार ? ज्यांचे हातावर पोट आहे व रोजच्या कमईवर जी मंडळी गल्लीबोळातील किराणा मालाच्या दुकानात जाऊन माल खरेदी करतात अशा लोकांचे तर बेहाल आहेत. मोठय़ा दुकानदारांकडून छोटे दुकानदार माल खरेदी करतात. आता छोटय़ा दुकानदारांनाच किमान १० ते १५ टक्के किंमत वाढवून माल खरेदी करावा लागतो आहे. त्यांनी ग्राहकांना तो कोणत्या किमतीने विकायचा, हा प्रश्न आहे.

आता प्रशासनाने भाववाढ केल्याची कारवाई केली तर मोठे दुकानदार सुटून जातील व छोटे दुकानदार मात्र अडचणीत येतील. जिल्हाधिकाऱ्यांनी किराणा भुसार माल असोसिएशन व सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन उपाययोजना केली पाहिजे व सामान्य माणूस यात भरडला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

तंबाखू, गुटखा, सिगारेट यांची अवैध विक्री आता किराणा मालाच्या दुकानातून

प्रशासनाने पानटपऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तंबाखू, गुटखा, सिगारेट, बिडी अशा वस्तू आता किराणा मालाच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. बुधवारपासून या वस्तूच्या किमतीही अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आल्या आहेत. ५ रुपये किमतीचा तंबाखूचा तोटा ७ रुपयाला विकला जातो आहे. १० रुपयाचा विमल गुटखा २० रुपये किमतीत, ७ रुपयाची ब्रिस्टॉल सिगारेट १० रुपयाने विकली जाते आहे. एकाच वेळी अनेक समस्या उद्भवत असल्यामुळे अशा छोटय़ा विषयांकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही.

२४ तास मॉलची सेवा कोणाच्या जिवावर ?

आतापर्यंत शहरातील मॉल कधीच २४ तास सुरू नव्हते. कोरोनाची भीती चर्चिली जाऊ लागल्यानंतर आहे ते कामगार काम करण्यास तयार नाहीत. त्यांनाही जीवाची भीती असल्याने विविध कारणे सांगून ते सुट्टीवर जात आहेत. दिवसादेखील मॉल चालवायचा कसा याची चिंता लागलेली असताना २४ तास हे मॉल उघडे ठेवायचे कसे ? असा प्रश्न मॉलचालकांना पडला आहे. शासनाचा आदेश असल्याने तो पाळण्याचा ते प्रयत्न करतील मात्र सेवा देणारे कामगार नसतील तर २४ तास केवळ मालक काऊंटरवर बसणार का ? असा प्रश्न आहे.

किराणा आणि भुसार मालाचा तुटवडा होणार नाही, याची काळजी सरकारने घेण्याची गरज आहे, असे मत किराणा व भुसार माल असोसिएशनचे बसवराजअप्पा वळसंगे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 1:00 am

Web Title: rush to buy for essentials things abn 97
Next Stories
1 ‘होम क्वारंटाइन’ असताना बाहेर फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
2 करोनाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेला बळी पडू नये
3 साताऱ्यात आणखी ८ जणांचे नमुने तपासणीसाठी
Just Now!
X