दिगंबर शिंदे

एरवी काचेच्या भिंतीआड दिसणारे नामांकित कंपन्यांचे कपडे सांगलीच्या रस्त्यावर सेलने विक्री करण्याचा प्रयत्न काही व्यापारी करीत असून खरेदीसाठी ग्राहकांचीही झुंबड उडत असल्याचे चित्र महापुरानंतर सांगलीच्या कापडपेठेत दिसत आहे. याचबरोबर महापुराच्या पाण्यात दहा दिवस राहिल्याने खराब झालेल्या दुचाकींच्या दुरुस्तीसाठी वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत.

सांगलीच्या गावठाण भागात कृष्णेच्या महापुराने अतोनात नुकसान केले असून याची गणती अद्याप करता आलेली नाही. गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड, कापड पेठ आदी ठिकाणी असलेली दुकानाची शोरूम दहा ते पंधरा फूट पाण्यात आठ दिवस होती. यामुळे दुकानातील मालाचे प्रचंड नुकसान झाले असून दूरचित्रवाणी, एलईडी, एलसीडी, संगीत उपकरणे, धुलाई यंत्रे, शीतपेटी, संगणकासह इलेक्ट्रॉनिक वस्तू आठ दिवसांहून अधिक काळात पाण्यात राहिल्याने खराब झाले आहे. स्टेशन रोडवरील एसएफसी मेगा मॉलच्या तळघरात रिलायन्स कंपनीचे शोरूम असून या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या. मात्र महापुराचे पाणी रस्त्यावर दोन फुटांनी वाहिल्यामुळे तळघर पाण्यात गेले. यामुळे कोटय़वधीचे साहित्य खराब झाले आहे.

तसेच कापड पेठ, हरभट रोड येथे तयार कपडय़ांच्या दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे कपडे खराब झाले आहेत. दुकानात आठ दिवसांहून अधिक काळ भिजल्याने खराब झालेले कपडे सेलद्वारे विक्रीसाठी रस्त्यावर मांडण्यात आले असून अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे पन्नास रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत विकले जात आहेत.

धान्य बाजारात पुराच्या पाण्याने दैना उडविली असून गोदामात ठेवलेले धान्य पूर्णत कुजले असून कोंबही आले आहेत. यामुळे पाण्यामुळे खराब झालेले धान्य रस्त्यावर टाकून गोदामे स्वच्छ करण्यात व्यापारी गुंतले आहेत. काही दुकाने अद्याप कुलूपबंद असून ती उघडल्यानंतर प्रत्यक्ष हानी किती झाली हे समोर येणार आहे.

सराफ पेठेमध्येही सात-आठ फूट महापुराचे पाणी साचून राहिले होते. यामुळे सराफाकडील सोने, चांदी धातूचे असल्याने हानी झाली नसली तरी पुराच्या पाण्यामुळे तयार दागिन्यांचे नुकसान झाले आहे. हे दागिने पुन्हा तयार करावे लागणार असून चकाकी आणि कलाकुसर गायब झाली आहे. शोरूममध्ये दागिने ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले ट्रेही खराब झाले आहेत. फíनचर, शोरूमचे खराब साहित्य हलविण्याचे काम युद्धपातळीवर अद्याप सुरू आहे.

महापुराच्या पाण्यामुळे बाधित क्षेत्रात असलेल्या दुचाकीही मोठय़ा प्रमाणात खराब झाल्या असून दुरुस्तीसाठी  रांगा लागल्या आहेत. शहरातील तसेच दुचाकीबरोबरच काही चार चाकी वाहनेही महापुराच्या तडाख्यात सापडली असून गॅरेजला वाहन दुरुस्तीसाठी ओढून नेण्यात येत असल्याचे ठिकठिकाणी आढळून येत आहे.

ध्वनिवर्धक साहित्यही खराब झाले असून तेही दुरुस्तीसाठी कारागिराकडे सोपविण्यात येत असून दुरुस्तीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत.