जिल्हा पत्रकार संघाच्या स. मा. गर्गे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक तथा मुक्त पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांची निवड जाहीर झाली. शनिवारी (दि. १२) होणाऱ्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, तसेच लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. रोख एक लाख रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने इतिहास संशोधक व पत्रकार स. मा. गर्गे यांच्या नावाने राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दरवर्षी दिला जातो. आतापर्यंत खासदार भारतकुमार राऊत, खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुधीर गाडगीळ व आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचे सहाव्या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार व क्रीडा समीक्षक संझगिरी यांनी पत्रकारिता क्षेत्रात अनेक दैनिकांमधून लेखन केले आहे. आतापर्यंत त्यांची १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यात खेळ, क्रीडा, चित्रपट, ललित, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण यांचा समावेश आहे. १९८३ ते २०११ पर्यंत झालेल्या सर्व क्रिकेटच्या विश्वचषकांचे प्रत्यक्ष त्या देशात जाऊन त्यांनी वार्ताकन केले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री प्रकाश सोळंके, खासदार रजनी पाटील आदींच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली.