उन्हाळय़ाची सुटी व लग्नसराईचा एस.टी. महामंडळाला चांगला फायदा होत असून, गेल्या १० दिवसांत एस.टी.चे उत्पन्न ३४ लाख रुपयांनी वाढले.
एस.टी. सातत्याने आíथक अडचणीत असते. विविध सवलत योजनांमुळे केवळ सवलतधारकच मोठय़ा संख्येने एस.टी.ने प्रवास करतात. त्याच्या सवलतीची रक्कम सरकारकडून देय असते. त्यामुळे अन्य प्रवाशांना आकर्षति करण्यासाठी एस.टी. विविध नव्या योजना राबवत असते. उन्हाळय़ाच्या सुटीत एस.टी.चे उत्पन्न दरवर्षीच वाढते. लांब पल्ल्याच्या ठिकाणी जादा बस सोडणे, प्रवाशांच्या सोयीच्या वेळा लक्षात घेऊन बस उपलब्ध करणे यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा एस.टी.चे उत्पन्न सुमारे ७ टक्क्यांनी वाढले. गेल्या १० दिवसांत लातूर आगारास ७ लाख ५९ हजार, उदगीर ७ लाख २ हजार, अहमदपूर ५ लाख ३८ हजार, निलंगा ७ लाख १७ हजार व औसा आगारास ७ लाख १ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले. प्रवाशांनी एस.टी.च्या सोयीचा लाभ घेतल्याबद्दल विभाग नियंत्रक डी. बी. माने यांनी आभार मानले. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एस.टी.चा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.