विविध घटकांना सवलती देताना एसटीचे टाके ढिले
सामाजिक बांधीलकीपोटी प्रतिवर्षी स्वत:च्या तिजोरीवर ३३० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा घेणाऱ्या एसटी महामंडळाचे तब्बल १५२६ कोटी सरकारकडून येणे आहे. या सामाजिक बांधीलकीचाच भाग म्हणून समाजातील २४ घटकांना तिकीट दरांत सवलत दिली जाते. या सवलतीची रक्कम यंदा १०५७ कोटी रुपये एवढी आहे. त्याशिवाय गेल्या वर्षांतील थकबाकीही सरकारकडून येणे आहे. परिणामी आर्थिक गर्तेत चाललेल्या एसटीला या ‘सामाजिक बांधिलकी’चा आणि सवलतींचा चांगलाच फटका बसत आहे.
समाजातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे विजेते, अपंग, मानसिकदृष्टय़ा दुर्बल घटक, अशा अनेक घटकांना एसटीतर्फे तिकीट दरांत सवलत देण्यात येते. याबाबत राज्य सरकार निर्णय घेत असते. तसेच हे सवलत मूल्य राज्य सरकारने एसटीच्या तिजोरीत जमा करायचे असते. मात्र, येत्या मार्चअखेपर्यंत राज्य सरकारकडे एसटीच्या तब्बल १५२६ कोटी रुपयांची थकबाकी होती.
नवीन कामगार वेतन करारामुळे एसटीच्या तिजोरीवर पुढील चार वर्षांत १६०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्याशिवाय डिझेलच्या दरवाढीचे संकटही एसटीला नेहमीच भेडसावत असते. त्यामुळे राज्य सरकारने ही थकबाकी एकरकमी एसटीला द्यावी, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी वारंवार करत असतात. मात्र राज्य सरकारने अद्याप या गोष्टीचा गांभीर्याने विचार केलेला नाही. राज्य सरकार टप्प्याटप्प्याने हे देणे देत असले, तरी एसटीच्या सध्याच्या आर्थिक स्थितीपुढे हे देणे म्हणजे ‘दर्यामें खसखस’ आहे, असे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक (५०%), शालेय विद्यार्थी, अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत शालेय ५वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थिनी (१००%), अंध व अपंग व्यक्ती आणि त्यांचा जोडीदार (७५%-५०%), विद्यार्थ्यांना सहलीसाठी गाडी (५०%), मोठय़ा सुटीत घरी परतणारे विद्यार्थी, स्वातंत्र्यसैनिक, दलित मित्र पुरस्कारार्थी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी, क्षयरोगी, कुष्ठरोगी, कर्करोगी, मानसिकदृष्टय़ा अपंग व्यक्ती, अधिस्वीकृत पत्रकार, छत्रपती पुरस्कारार्थी, आदिवासी पुरस्कारार्थी यांना एसटीकडून सवलत मि़ळते.
एसटीच्या लाभार्थी घटकांपैकी ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनी आणि अंध व अपंग व्यक्ती यांच्यासाठीचे सवलत मूल्य दरवर्षी सर्वात जास्त असते.