भारतात हिंदुत्वपणा दाखवायचा व भारताबाहेर भारत हा बुद्धांचा, गांधींचा देश आहे असे भासवत राजकारण करायचे, अशा परखडपणे पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सबनीस यांचा येथे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी सबनीस यांनी धुळ्यातील वास्तव्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देतानाच राजकारण व जातीयतेविषयीची मते मांडली. फुले, शाहू, आंबेडकर, साने गुरूजी यांच्या विचारांनी आपण घडलो. दीनदलितांसाठी सातत्याने संघर्ष करत राहिल्याने बऱ्याच जणांना गेली ३५ वर्षे आपण ब्राह्मण आहोत हेच माहीत नव्हते. समाजात प्रचंड जातीयता असून कुठे तरी ही जातीयता कमी झाली पाहिजे. काँग्रेसचा नाकर्तेपणा व मोदींचा हिंदुत्ववादीपणा या बळावरच केंद्रात भाजप सरकार स्थापन होऊ शकले. राजकारणाचा आदर करतो, परंतु भ्रष्टाचाराला विरोध आहे. तशी समाजातील सर्व माणसे चांगली आहेत, असेही सबनीस यांनी नमूद केले. जिल्ह्य़ात ३५ वर्षे वास्तव्य केल्याने या मातीने व जिल्ह्य़ातील विविध चळवळींनी आपणास घडविले. त्यामुळे खान्देशच्या मातीचा आपणास आदर्श आहे. साहित्यातून दलित, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, तळागाळातल्या समाजासाठी विचारांच्या लढाईला सुरुवात धुळे जिल्ह्य़ातून झाली. जिल्ह्य़ातील विद्यावर्धिनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यामुळेच या यशापर्यंत पोहोचता आले. फुले, शाहू, आंबेडकर, साने गुरूजी यांच्या विचारांनी आपण घडलो, असेही सबनीस यांनी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी मिसाळ यांच्यासह माजी आमदार पी. डी. दलाल, एम. जी. धिवरे, साहित्यिक जगत्पुरीया, आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास माजी मंत्री हेमंत देशमुख, राजवर्धन कदमबांडे, प्रा. शरद पाटील, भूपेंद्र लहामगे, आदी उपस्थित होते.