मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि मुंबई पोलिसांच्या सीआययू विभागाचे अधिकारी सचिन वाझे या दोघांनी लिहिलेल्या पत्रांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यात परमबीर सिंह यांच्या पत्रामध्ये करण्यात आलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांमुळे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यापाठोपाठ आता सचिन वाझे यांच्या पत्रामध्ये करण्यात आलेल्या आरोपांवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. या मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीवरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

याच कारणामुळे CBI चौकशीवर बंदी

सचिन सावंत यांनी ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला आहे. “राज्यांशी संबंधित विषयांवर सीबीआय चौकशी राज्य सरकार किंवा उच्च न्यायालय निर्देशित करते. पण वस्तुत: हल्ली सीबीआय कुणाच्या मार्गदर्श आणि आदेशांनुसार चौकशी करते, हे भाजपाने दर्शवून दिले आहे. त्याबद्दल भाजपाचे धन्यवाद. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याच कारणामुळे सीबीआय चौकशीवर बंदी घातली आहे”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

sachin sawant tweet on bjp demand cbi inquiry of ajit pawar anil parab
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपावर टीका

चंद्रकांत पाटील यांचं अमित शाह यांना पत्र

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. “सचिन वाझे यांनी चौकशीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घोडावतला बेकायदा गुटखा विक्रेते आणि उत्पादकांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितल्याचं म्हटलं आहे”, असं पाटील यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

 

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

अजित पवार यांच्यासोबतच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याही सीबीआय चौकशीची पाटील यांनी मागणी केली आहे. “अनिल परब यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचं वाझेंनी चौकशीत म्हटल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रात लिहिलं आहे. त्यामुळे आता राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये लेटर वॉर दिसू लागलं आहे.