20 November 2019

News Flash

दोन हजार माकडांचे पालकत्व!

ऐन दुष्काळातही सचिन सोनारीकर यांच्याकडून खाद्य, पाण्याची सोय

|| रवींद्र केसकर

ऐन दुष्काळातही सचिन सोनारीकर यांच्याकडून खाद्य, पाण्याची सोय

सकाळी झोपेतून उठल्यानंतर दार उघडण्यापूर्वी तब्बल शे-दोनशे माकडांची टोळी त्याची वाट पाहत असते.  कारण त्या सर्वाचा सांभाळ तो करतो. सचिन सोनारीकर असे या प्राणीमित्राचे नाव आहे. परंडा तालुक्यातील सोनारी येथे  ऐन दुष्काळातही  तो माकडांसाठी दोन क्विंटल खाद्य आणि हजार लिटर पाणी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे . माकडांचे स्वेच्छेने पालकत्व स्वीकारणाऱ्या सचिनला अनेक जण स्वेच्छेने मदत करु लागले आहेत.

परंडा तालुक्यातील सोनारी येथे काळभरवनाथाचे मोठे मंदिर असल्याने अनेक भाविक येतात. मंदिर परिसरात माकडांची संख्याही मोठी आहे. मात्र, अनेक माकडांना पुरेसे खायला मिळत नाही. विशेषत: दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ त्यानाही मोठय़ा प्रमाणात बसते. आता उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. माणसांना पिण्याचे पाणी विकत घेण्याखेरीज दुसरा पर्याय शिल्लक नाही. अशावेळी मुकी जनावरे आणि पशुप्राण्यांच्या अवस्थेचा विचार न केलेलाच बरा, असे चित्र आहे. अशा बिकट दुष्काळी परिस्थितीत सोनारी येथील दोन हजार माकडांना एका तरुणाने लळा लावला आहे. तीव्र दुष्काळी परिस्थितीत दररोज २०० किलो खाद्य आणि एक हजार लिटर पाणी माकडांसाठी देण्यासाठी सचिन सोनारीकर स्वत:चे पैसे खर्च करीत आहे. मागील तीन वर्षांपासून त्यांना दररोज एक वेळ पोटभर खाद्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सचिन सोनारीकर यांनी आपल्या खांद्यावर स्वखर्चाने पेलली आहे.

सोनारीकर यांचे मंदिरालगत प्रासादिक वस्तूंचे छोटे दुकान आहे. माकडांची उपासमार पाहून तीन वर्षांपूर्वी या तरुणाने त्यांच्यासाठी दररोज काहीतरी खाद्य उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले प्रयत्न आता चांगलेच आकाराला आले आहेत. दररोज दीड ते दोन िक्व टल खाद्य आणि एक हजार लिटर पाणी माकडांसाठी ते उपलब्ध करीत आहेत. दररोज सकाळी उठल्यानंतर माकडांच्या खाद्याची व्यवस्था करण्यात ते सकाळचा वेळ घालवितात. कधी गहू, तांदूळ, शेंगदाणे, तर कधी फुटाणे, ज्वारी. एखाद्या दिवशी एखाद्या भाविकाने सढळ हाताने मदत केलीच तर बिस्कीटे किंवा केळी असे ते जमवून आणतात. तीन वर्षांपासून हे सातत्याने सुरू आहे. त्यामुळे आता गावातील एखाद्याचा वाढदिवस, लग्नसमारंभ किंवा अन्य कार्यक्रम असला तर माकडांसाठी सचिन सोनारीकरांपर्यंत मदत पोचते. आता दुष्काळात अडचण असली तरी त्याचे हे काम थांबलेले नाही. माकडांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी मदत झाली तर बरे होईल, एवढेच सचिन सांगतो.

First Published on May 19, 2019 12:22 am

Web Title: sachin sonarikar helps monkey
Just Now!
X