स्वच्छ भारत मिशन एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. आम्हा सर्व देशवासीयांनी वर्षांतील १ तास आपल्या धरतीमातेच्या स्वच्छतेकरिता द्यावा, देशाच्या प्रगतीकरिता आरोग्याकडेही लक्ष असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वच्छतेसह आपल्या आरोग्याची चिंता करावी, खान्यापिन्याकडे विशेष लक्ष देऊन आरोग्य सुदृढ ठेवावे, तसेच देशात मधुमेहींची संख्या तीव्रतेने वाढत आहे. याकडेही प्रत्येकाने काळजी घ्यावी. आज देशात ७५ दशलक्षाहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांची जनजागृती करून पुढील १०-१२ वर्षांत ही संख्या ४० दशलक्षावर आणण्याचा विडा मी उचलला आहे. त्यात तरुण विद्यार्थ्यांचेही सहकार्य मोलाचे ठरणार असून मधुमेहाविरुद्धचा ही मॅच आपण नक्कीच जिंकू, अशा विश्वास व्यक्त करून उत्कृष्ट आरोग्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील कार्यही उत्कृष्टच होते, असा मंत्र विश्वविख्यात किकेटपटू व भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांनी गोंदियाकरांना दिला.
आज येथील शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांची १०९ व्या जयंतीनिमित्त आयोजित मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक वितरण समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल्ल पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी, गीतकार-लेखक व कवी प्रसुन जोशी, माजी मंत्री अनिल देशमुख, नाना पंचबुद्धे, डॉ.अंजली तेंडुलकर, मंजिरी हिराणी, आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार शेखर गजभिये, माजी आमदार रामरतन राउत, अनिल बावणकर, मधुकर कुकडे, हरिहरभाई पटेल, वर्षां पटेल, पूर्णा पटेल, प्रजेय पटेल आदी उपस्थित होते. गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ातील शालांत व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या १६ गुणवंत विद्यार्थ्यांंना सचिन तेंडूलकर, राजकुमार हिराणी, प्रसुन जोशी, प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
विक्रम साठे यांच्याशी संवाद साधतांना सचिनने लिहिलेल्या ‘प्लेईंग इट माय वे’ या पुस्तकातील काही महत्वाच्या प्रसंगांची आठवण करून देत २०११ च्या विश्वचषक विजयासह बालपणातील उदंड, आपल्या आयुष्यात मुकलेले महाविद्यालयीन जीवन, गुरू रमाकांत आचरेकर सर, शिवाजी पार्क, डॉ.अंजलीसोबत आपली ओळख कशी झाली, त्यातीलच लग्नप्रसंग, आपल्या सुरुवातीच्या १९८९ पाकिस्तान दौऱ्यासह त्याकाळी पाकिस्तानचे उत्कृष्ट गोलदांजी आक्रमण, पहिल्या कसोटीतील अपयशानंतर बाथरूममध्ये रडलो, अशा व क्रिकेटशी असलेल्या चिकाटीचे काही महत्वाची उदाहरणे देत ठळक आठवणींना उजाळा दिला. तुमच्याकडे जे आहे त्याचा उत्कृष्ट उपयोग करा, असेही त्याने विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे असलेले राजकुमार हिराणी यांनी या अभियांत्रिकी महाविद्यालयाची भारतातील एक उत्कृष्ट शिक्षण संस्था असल्याचे सांगून ते म्हणाले, जर ‘थ्री इडियट’ चित्रपटापूर्वी गोंदियातील या महाविद्यालयात आलो असतो तर ‘थ्री इडियट’ करिता याच कॉलेजचा परिसर निवडला असता.
कवी, लेखक व गीतकार प्रसुन जोशी यांनी ‘बाबुल जिया मोरा घबराये, बिन बोले रहा न जाये, बाबुल मेरी इतनी अरज सुन लिजो’ ही निर्भया प्रकरणानंतर लिहिलेली कविता ऐकवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख सत्तेची कुर्सी सुटल्याची खंत एक गीत ‘तेरी जुल्फो से जुदाई तो नही मांगी थी. कैद मांगी थी रिहाई तो नही मांगी थी’ ऐकवून व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आमदार गोपालदास अग्रवाल यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. या दोन्ही जिल्ह्य़ांना सिंचनाच्या क्षेत्रातही विकासाभिमुख करण्याचे आपले प्रयत्न असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन आमदार राजेंद्र जैन यांनी केले. आभार नरेश माहेश्वरी यांनी मानले.

क्षणचित्रे :
* सचिन तेंडुलकरने व्यासपीठावर प्रवेश करतांच विद्यार्थ्यांनी सचिनच्या नावाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
* व्यासपीठावर भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या उपस्थितीमुळे याचे पडसाद गोंदिया जिल्हा भाजपमध्ये पडणार की काय, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात वर्तविली जात आहे.
* प्रफुल्ल पटेलांचे केंद्रातील मंत्रीपद गेले. मात्र, कार्यक्रमातील गर्दी ओसरलेली नव्हती.
* कार्यक्रमाच्या शेवटी सचिन संवाद साधण्याकरिता आल्यावर विद्यार्थ्यांनी पुन्हा सचिन..सचिन करत परिसर दणाणून सोडला.