राज्याच्या राजकारणात शाब्दिक चकमकी सुरू असतात. दोन दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. “राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर समजलं की ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो”, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील त्यांनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे मंत्री रोहित पवार यांनी शरद पवार यांची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी तुलना केली होती. त्याच तुलनेला माजी खासदार निलेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.

निलेश राणेंचे उत्तर

त्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. “सचिनची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही. सचिन आऊट जरी झाला तरी देशाला त्याच्यावरती विश्वास होता की जे काही करेल ते सचिनच करेल. इथे देशाचं सोडा पण महाराष्ट्रामध्ये पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही. साखर कारखान्यांच्या पलीकडे ज्यांना महाराष्ट्र दिसत नाही, त्यांनी बोलू नये”, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी पवार कुटुंबावर आणि शरद पवार यांच्यावर केली.

रोहित पवारांचे ट्विट…

रोहित पवार यांनी एक ट्विट केलं होतं. “सचिनकडून एखादा बॉल सुटला, तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन टीव्हीवर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा… “अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही…” पवार साहेबांबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं,” अशा शब्दांत रोहित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला होता.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं. शरद पवार यांच्याबद्दल वाईट शब्द उच्चारून त्यांचा अवमान करण्याचा माझा मुळीच हेतु नव्हता. मी एका कायद्याच्या तरतुदींबद्दल संदर्भ देत असताना त्यांच्याबद्दलचा तसा उल्लेख केला होता, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.