सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर वरुण सरदेसाई आणि नितेश राणे आमने-सामने आले आहेत. वाझे यांच्यासोबत वरुण सरदेसाईंचे संबंध असल्याचा दावा करत आमदार नितेश राणे यांनी एनआयएने यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली होती. राणे यांच्या आरोपानंतर वरुण सरदेसाई यांनी न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला. देसाई यांच्या इशाऱ्यानंतर नितेश राणेही आक्रमक झाले आहेत. “शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत, मला नोटी नोटीस पाठवली, तर आम्ही शिवसेनेची प्रकरणं बाहेर काढू,” गर्भित इशारा राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या आरोपानंतर वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. वाझे यांच्यासोबत संबंध असल्याच्या आरोपावर उत्तर देताना राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा आपण त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असं सरदेसाई यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर राणे कुटुंबियांची पार्श्वभूमी सांगत त्यांनी टीका केली होती. सरदेसाई यांनी दिलेल्या इशाऱ्याला नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरुण सरदेसाई यांना लक्ष्य केलं.

आणखी वाचा- अंबानी स्फोटकं प्रकरण : सीसीटीव्ही, डीव्हीआर सचिन वाझेंच्या सहकाऱ्यांनी नेले

“तपास यंत्रणांनी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाईंच्या संबंधांचा तपास करावा म्हणून मी माहिती उघड केली. आता वरुण सरदेसाई मला न्यायालयाच्या नोटिसीची धमकी देऊन माझ्यावर दबाव आणू पाहत आहेत का? असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. माझ्याकडे असलेली माहिती तपास यंत्रणांनी मागितल्यास मी देईन. सचिन वाझे यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आणल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू,” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

आणखी वाचा- घटनाक्रम! स्कॉर्पिओ, मनसुख हिरेन मृतदेह ते सचिन वाझेंना अटक; कोणत्या दिवशी काय घडलं?

“आम्ही ३९ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल, तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढायची का? ही माहिती बाहेर आली, तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही,” असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- नितेश राणे विरोधात बदनामीचा खटला दाखल करणार; आरोप सिद्ध करून दाखवा अन्यथा… – वरूण सरदेसाई

सरदेसाई काय म्हणाले होते?

“राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय. आज ते भाजपामध्ये गेलेत, तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही,” असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होतं.