News Flash

“…मग सीबीआय धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ईडी कशाला?”

अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईवर काँग्रेसचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख. (संग्रहित छायाचित्र)

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीबीआयनंतर आता या प्रकरणात ईडीनेही उडी घेतली आहे. सक्तवसुली संचालनालयाने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यावरून राज्याच्या राजकारणात वादाची ठिणगी पडली आहे. देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणावरून काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. “हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे,” असं म्हणत काँग्रेसनं काही सवालही उपस्थित केले आहेत.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडेले आहेत. याप्रकरणाची चौकशी सध्या सीबीआय करत असून, आर्थिक व्यवहारासंदर्भातील आरोपांप्रकरणी ईडीने ईसीआयआर (गुन्हा) दाखल केला आहे. याच अनुषंगाने ईडीने तपास सुरू केला असून, राजकीय वादाला तोंड फुटताना दिसत आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. करोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे तसेच राजकीय सूडबुद्धी ही आहे. परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे,” असं सचिन सावंत यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

“आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग सीबीआय धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ईडी कशाला? आणि जर पैसे दिले असे सीबीआय व ईडीचे म्हणणे असेल, तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे,” असं अशी परखड टीका सचिन सावंत केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:22 pm

Web Title: sachin vaze parambir singh allegations ed files ecir anil deshmukh sachin sawant congress bmh 90
Next Stories
1 Video : राज्यात करोनाची तिसरी लाट तर नाही ना?
2 लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील १९ हजार नागरिकांवरील मृत्यूचं संकट टळलं
3 आता ईडीनेेही दाखल केला गुन्हा….अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ!
Just Now!
X