सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. भाजपाने या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून, महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत आज (मंगळवार)माध्यमांसमोर बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. “कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचं कुणाला काढायचं हे ज्या त्या पक्षाचं काम असतं. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.” असं यावेळी अजित पवार यांनी बोलून दाखवलं.

अजित पवार म्हणाले, “सुरूवातीपासून मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे, कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं महाविकासआघाडी सरकारचं काही कराण नाही आणि सरकार तसं अजिबात करणार नाही. हे मी देखील राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने स्पष्ट करू इच्छितो. एनआयए व एटीएस या दोन्ही तपास यंत्रणा आता चौकशी करत आहेत. त्यामुळे ज्या काही घटना समोर येत आहेत, त्याप्रमाणे त्यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल हे मी स्पष्टपणे सांगतो.”

आणखी वाचा- गृहमंत्री महोदय… तुम्ही नेमकं केलं काय?; आता अनिल देशमुख भाजपाच्या ‘रडार’वर

तसेच, “महाविकासआघाडीचं सररकार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन तयार केलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही चांगलीच असली पाहिजे. कुणालाही पाठीशी घालण्याचं अजिबात काही कारण नाही. कुणी कुठल्या पक्षात होतं, कुठल्या पक्षात नव्हतं तो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. आता काही दिवसांपूर्वी सभागृह सुरू असताना मला सभागृहात विरोधी पक्षाने एक गोष्ट लक्षात आणून दिली की, विरोधी पक्षनेत्याबद्दल सोशल मीडियावर काही चुकीच्या पद्धतीच्या बातम्या दिल्या गेल्या. त्यावेळी ताबडतोब आम्ही सभागृहात सांगितलं की संध्याकाळ होण्याअगोदर त्या संदर्भातील चौकशी केली जाईल आणि जो दोषी असेल त्याला अटक केली जाईल, त्यानंतर रात्रीपर्यंत संबंधितास अटक करण्यात आली. तशाच पद्धतीने आता या दोन्ही तपास यंत्रणा चौकशी करत आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप हा कुणाचाही असता कामानये हीच आमची, सरकारची भूमिका आहे. जे दोषी असतील, ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे त्या ठिकाणी जातील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.” असं देखील अजित पवार यांनी बोलून दाखवलं.

आणखी वाचा- ‘एनआयए’ने तपास पूर्ण झाल्यावर सर्वांसमोर बोलावं; विनाकारण बातम्या पसरवू नये -जयंत पाटील

याशिवाय “कुणाला मंत्रीमंडळात ठेवायचं कुणाला काढायचं हे ज्या त्या पक्षाचं काम असतं. आता अधिकाऱ्यांच्या संदर्भात काहीजरी निर्णय़ घ्यायचा असेल, तर राज्याच्या प्रमुखांना पूर्णपणे अधिकार आहे. आजपर्यंत मागील सव्वा वर्षाच्या काळात वेळोवेळी तशा पद्धतीचे निर्णय़ ज्यावेळेस घेण्याची गरज असते, त्यावेळी मुख्यमंत्री निर्णय घेतात, याचा अनुभव आपण सर्वांना घेतलेला आहे. सचिन वाझे संदर्भात सरकारकडून ताबडतोब कार्यवाही करण्यात आलेली आहे. महाविकासआघाडीमध्ये अजिबात मतभेद नाही.” असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.