शेतकरी आंदोलकांवर लाठय़ाकाठय़ा चालवणारी, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारी मंडळी आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढत आहेत, हे प्रेम कुठून आले? त्यांनी शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा दिल्या असत्या तर शेतकरी एका कर्जातून दुसऱ्या कर्जात अडकत गेला नसता. शेतकरी आत्महत्या हे पाप अनेक वष्रे सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे असून, ते झाकण्यासाठी त्यांनी संघर्ष यात्रेचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याची टीका राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जाच्या विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी संघर्ष यात्रेकडे लक्ष वेधत गेली साठ वष्रे हे लोक सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. सहकारी संस्था, कारखाने, दूध संस्था, सूतगिरण्या त्यांच्या ताब्यात असतानाही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमाफीसंदर्भात दोन वर्षांपूर्वी किमान कर्जमुक्ती आंदोलन हाती घेतले. त्या अनुषंगाने शेतकरी कर्जाची आकडेवारी, त्यांचे मागणी अर्ज संकलन करण्यात आले. आत्ता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांप्रति असणारे पुतना मावशीचे प्रेम उफाळून आले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेतले असते, शेतीमालाला योग्य भाव दिला असता तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळच आली नसती.  कर्जमाफीनंतर शेतकरी पुन्हा दुसऱ्या कर्जाच्या जोखडात अडकणार नाही यासाठीच्या उपाययोजनाही कराव्या लागतील. राज्य सरकारकडून कर्जमाफीबाबत अभ्यास सुरू आहे. यातून सरकार निश्चित मार्ग काढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी अनेक वष्रे लढा देत आहेत. त्यांनी काढलेली आसूड यात्रा थांबवावी लागली असली तरी त्यांच्या मागण्यांची दखल सरकार घेईल असा विश्वास खोत यांनी दिला.

कराडमध्ये शेतकरी बाजार

दरम्यान, सदाभाऊंनी कराड नगरपालिकेला भेट दिली. या वेळी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी नगरपालिकेचे प्रांगण उपलब्ध करून देण्याचा, तसेच शहरात अन्य दोन ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जागा देण्याच्या सूचना खोत यांनी केल्या. सदरची सूचना तातडीने मान्य करत उद्या रविवार पासून कराड पालिकेच्या प्रांगणात शेतकरी बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.