राजू शेट्टी सरड्याप्रमाणे रंग बदलतात अशी टीका माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राजू शेट्टींसारख्या भंपक माणसाविषयी फार बोलावे अशी माझी इच्छा नाही असंही ते म्हणाले आहेत. राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही असं म्हटलं होतं. सांगलीमधील इस्लामपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेटींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

“आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेच तुमची संघटना मोठी झाली. आमच्यासारख्या माणसांमुळेच तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय. मला तुमच्यासारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही,” असा टोला सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला. “करोना संकटामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. निकृष्ट बियाणं, दूध दर यावरुन शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता शेतकरी प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे,” असा सल्ला राजू शेट्टी यांनी दिला आहे.

“राजू शेट्टी यांनी प्रसिद्धीत राहायचं असल्याने माझं नाव घेत असतात. पण मला त्या भंपक माणसाविषयी जास्त बोलण्याची इच्छा नाही. सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा. २०२४ मध्ये आमने सामने आल्यानंतर सदाभाऊच्या विषयावर बोलता येईल,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.