21 April 2019

News Flash

लोकसभा आखाडय़ातील मल्ल निश्चित!

खोत यांनी केलेले शक्तिप्रदर्शन आणि भूमिका मुख्यमंत्र्यांना भावल्याचे त्यांच्या प्रतिपादनातून प्रतीत झाले

खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत

कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघांमध्ये उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू

दयानंद लिपारे, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असताना कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित असल्याचे संकेत कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांना मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीवर माजी मंत्री अजित पवार यांनी शिक्कामोर्तब करतानाच त्यांच्या उमेदवारीच्या मार्गात काटे पेरणाऱ्या स्थानिक नेत्यांना या विषयावर मौन बाळगण्याचा सल्ला दिला आहे. महाडिक यांच्याविरोधात गतवेळेप्रमाणेच शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय मंडलिक यांची लढत होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरच्या आखाडय़ात लोकसभा निवडणुकीच्या लढतींचे फटाके फुटू लागले आहेत.

गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे उमेदवार कोण असणार, कोणत्या खासदाराची उमेदवारी कापली जाणार, कोणाला नव्याने संधी मिळणार यावरून चर्चा आणि घडामोडी यांना वेग आला आहे. हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांच्या विरोधातील नांगरणी कोण करणार आणि कोल्हापुरात धनंजय महाडिक यांचा उमेदवारीचा पत्ता कापला जाणार का, या चर्चाना उधाण आले आहे. या दोन्ही चर्चाना पूर्णविराम मिळणाऱ्या घटना या आठवडय़ात प्रमुख नेत्यांच्या दौऱ्यात घडल्या आहेत.

शेट्टी-खोत : शिवारातील संघर्ष निवडणुकीत

वर्षभर कोंडलेल्या अवस्थेला मोकळे करीत खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम ठोकला. तेव्हापासून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर टोकाची टीका सुरू केली. शेट्टींचे टीकास्त्र वर्मी लागल्याने भाजपने लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांना पराभूत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी भाजपने सक्षम उमेदवारांचा शोध जारी ठेवला. ४-५ नावे पुढे – मागे होत राहिली, पण एकमत कोणावर होत नव्हते. याचवेळी शेट्टी यांचे जुने मित्र, सहकारी आणि आताचे विरोधक सदाभाऊ  खोत यांनी शेट्टी यांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून ललकारण्यास आणि आव्हान देण्यासही सुरुवात केली. शेट्टी हे शरद जोशी यांची साथ सोडून स्वाभिमानीच्या स्वत:च्या शेतकरी संघटनेत उतरले. याच पावलावर पाऊल टाकत सदाभाऊ  यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना गेल्या विजयादशमीला केली. शेट्टी हे विशेष लोकप्रिय ठरले ते त्यांच्या ऊस परिषद आणि त्यातील नाटय़मयरित्या ऊसाची उचल जाहीर करण्याच्या पद्धतीमुळे. लगोलग खोत यांनीही शेट्टींच्या परिषदेच्या अगोदर आठवडाभर उसाचा दर मागण्यास सुरुवात करत स्वाभिमानाला शह देण्यास सुरुवात केली. यंदाही खोत यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा भरवला आणि एफआरपी अधिक २०० रुपये प्रतिटन भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. शेतकरी परिषद मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत असल्याची अपूर्वाई असल्याने शेतकरम्य़ांनी मोठी गर्दी केली. हीच सम गाठत सदाभाऊ  खोत यांनी ‘हातकणंगले मतदारसंघात बहुजन समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे’ असे म्हणत आपल्या उमेदवारीचे घोडे पुढे दामटताना शेतकरी आणि मराठा या दोन्ही बाबींचा विजयासाठी उपयोग होऊ  शकतो, हे मुख्यमंत्री फडणवीस आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारीचा निर्णय घेण्यात विशेष महत्व असलेले महसूल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गळी उतरवले.

खोत यांनी केलेले शक्तिप्रदर्शन आणि भूमिका मुख्यमंत्र्यांना भावल्याचे त्यांच्या प्रतिपादनातून प्रतीत झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोत यांना उद्देशून ‘सरकार तुमच्या पाठीशी आहे, वाटचाल सुरु राहू द्या’, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला. याच प्रतिपादनाचा आधार घेत आता खोत हे प्रत्येक कार्यक्रमात आपल्या उमेदवारीचा दावा स्पष्टपणे आणि सातत्याने करत आहेत. त्यांचे सहा तालुक्यांतील दौरे आणखीनच वाढले आहेत. मात्र, खोत यांनी उमेदवारी ठासून सांगण्यास सुरुवात केली असली तरी काही तांत्रिक मुद्दांचे स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे. त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो भाजप -शिवसेना युतीचा.

अशी युती झालीच तर हा मतदारसंघ सेनेकडे आहे. त्यामुळे उमेदवार कोण द्यायचा हे अर्थातच ‘मातोश्री’वर ठरेल. तसे झाल्यास खोत यांना नांगरणी करण्यापूर्वीच मळ्याबाहेर राहावे लागणार किंवा मग मतदारसंघ भाजपच्या वाटय़ाला येईल, असा निर्णय व्हावा लागेल. आता तरी याबाबत कसलेच संकेत दिसत नसल्याने खोत यांना युतीच्या निर्णयाकडे आशाळभूतपणे पाहण्याशिवाय अन्य काही करता येणे शक्य नाही. शिवसेनेचा मतदारसंघ असल्याचे निदर्शनास आणून दिले असताना खोत यांनीही ठामपणे काही न सांगता ‘योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले.

कोल्हापूरच्या आखाडय़ात पुन्हा महाडिक-मंडलिक

राष्ट्रवादीच्या पक्षीय कार्यक्रमात आणि संघटना बांधणीत खासदार धनंजय महाडिक यांचा काहीही सहभाग नसतो, उलट ते विरोधकांना बळ देतात, अशी बाजू कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी पहिल्या फळीच्या इशाऱ्याने मुंबईत झालेल्या बैठकीत थेट शरद पवार यांच्यासमोर मांडली. त्यामुळे आधीच महाडिकविरोधात रान उठवणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांनी आणखी गलका सुरू केला. याचवेळेला माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात येऊन लोकसभा निवडणुकीसाठी धनंजय महाडिक हेच उमेदवार असतील, असे स्पष्ट केले. खेरीज, या विषयावर आता कोणी बोलता कामा नये, असा दमही भरला. या भूमिकेमुळे महाडिक यांची कळी खुलली, तर विरोधकांची चरफड झाली. महाडिक यांना विरोध असला तरी त्यांच्याइतका सक्षम उमेदवार पक्षाकडे नाही, त्यांचे विरोधक आमदार हसन मुश्रीफ हे लोकसभेच्या आखाडय़ात येण्यास तयार नाहीत. संजय मंडलिक हा पर्याय असल्याचे मुश्रीफ सांगत असले तरी मंडलिक धनुष्यबाण खाली ठेवण्यास ते तयार नाहीत. या सर्व घटकांची गोळाबेरीज करून महाडिक यांच्या नावाला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावर मुश्रीफ यांनीही हे प्रकरण सुरू आहे, असे म्हणण्याऐवजी वादाला ‘स्वल्पविराम’ मिळाला आहे असे म्हणणे भाग पडले आहे. आता लक्ष असणार आहे ते महाडिक यांच्या उमेदवारीला प्रखरपणे विरोध करणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे. मुश्रीफ-पाटील या आमदारद्वयीचा मंडलिक यांच्याकडे कल आहे खरा, पण मंडलिक यांची भूमिका पाहता पुन्हा त्यांचा सामना धनंजय महाडिक यांच्याशी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

First Published on November 7, 2018 1:30 am

Web Title: sadabhau khot to contest lok sabha poll against mp raju shetty