आपण कायम परखड मत मांडत असल्याने त्याचा कधी तोटाही सहन करावा लागतो. त्यामुळे काही वेळा पोलीस संरक्षणातही राहण्याची वेळ आली, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  डॉ. सदानंद मोरे यांनी येथे मांडले. नाशिक जिल्हा वारकरी सत्कार समितीच्या वतीने आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सहकार्याने शनिवारी येथील रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. मोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत याआधीच्या काळातही संतांचे मोठे योगदान राहिले असल्याचा मोरे यांनी उल्लेख केला. तेराव्या शतकापासून तर सोळाव्या शतकापर्यंत समाजातील जातीपातीच्या भिंती तोडण्याचे कार्य संतांनी केले. पर्यावरणपूरक भूमिकाही संतांनी मांडली. तुकोबाराय तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक पुरुष होय. समाजात प्रतिभावंत मनुष्याची कदर झालीच पाहिजे. अशा व्यक्ती कधीही दुर्लक्षित राहू शकत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीतही वारकऱ्यांनी आपले आचार-विचार रुजविले हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासाचे द्योतक म्हणावे लागेल. मराठीसाठी संतांनी दिलेले व्यापक योगदान महाराष्ट्राबाहेर पोहोचण्यासाठी घुमानमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचा उपयोग होईल, असा आशावाद मोरे यांनी व्यक्त केला. नाशिककरांनी केलेल्या या सत्कारामुळे आपली जबाबदारी अधिकच वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले.  या वेळी ‘शब्द पालखी’ या अमर ठोंबरे लिखित पुस्तकाचे प्रकाशन सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मोरे यांच्या या सत्कार सोहळ्यास मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, वनाधिपती विनायकदादा पाटील, त्र्यंबकराव गायकवाड, कृष्णाजी भगत, मारुतीबुवा कुरेकर, दामोदर गावले, पुंडलिक थेटे, राम खुर्दळ आदी उपस्थित होते.