सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये सुरू असलेल्या कामांचा दर्जा पहिल्याच पावसाने उघड केला असून सर्व कामांचा दर्जा नामांकित त्रयस्थ संस्थेकडून तपासून घ्यावा आणि निकृष्ट कामामुळे झालेल्या नुकसानीस जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची सोमवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हा यंत्रणेकडून पावसाविषयी वारंवार सूचना देण्यात येऊनही पालिकेची कामे उरकण्याची घाई कामाला आलेली नाही. त्यामुळेच सुमारे ३०० एकर जागेवर उभारण्यात आलेल्या साधुग्राममधील स्वागत स्तंभ पहिल्याच पावसात उखडून गेले. साधुग्राममधील प्रसाधनगृह, स्वच्छतागृहाचे पत्रे उडून गेले. गोदावरी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या घाटांच्या रंगरंगोटीचेही नुकसान झाले. पहिल्याच पावसात रंग उडाले. काही ठिकाणी विद्युत खांबही वाकले. पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला. साधुग्राममध्ये पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीही उघडी पडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
एकाच पावसात सिंहस्थाच्या कामांची अशी अवस्था होत असेल तर पावसाळ्यात जोरदार पाऊस आणि वादळीवाऱ्याने काय होईल, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. या नुकसानीमुळे कामांच्या दर्जाविषयी शंका उपस्थित होत आहे. सिंहस्थात नाशिकमध्ये लाखो भाविक येणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे. असे असताना अशा प्रकारच्या कामांमुळे नाशिकचे नाव मलिन होऊ शकते. त्यामुळे आपण स्वत: या कामांची पाहणी करून निकृष्ट दर्जासाठी जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना खा. हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.