भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने विदर्भात राजकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुंडे यांच्या निधनाने मराठवाडय़ातील दुसरे सक्षम नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. भाजपच्या धंतोली आणि टिळक पुतळ्याजवळील कार्यालयात शोककळा असून मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आता उरल्या फक्त आठवणी..
गोपीनाथजी १९९२ साली भाजपच्या बुलढाणा शहर शाखेने आयोजित केलेल्या एकता यात्रेसाठी बुलढाण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून त्यांचे भाषण झाले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे, भाजपा नेते व त्यावेळचे नगराध्यक्ष केशवराव एकबोटे, भाजप शहर अध्यक्ष व भाजपा नेते गोकु ल शर्मा २००१ साली भाजपा नेते गोकुल शर्मा यांच्या घरी आले असतांना बुलढाण्याच्या तत्कालीन नगराध्यक्ष पुष्पाताई चांडक यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा सहकार नेते राधेश्याम चांडक यांचा सत्कार करतांना भाजपा नेते गोपीनाथ मुंडे. यावेळी गोकुल शर्मा, आमदार चैनसुख संचेती व शिरीष देशपांडे उपस्थित होते.

नियतीची निष्ठूर निती, ऋणानुबंधाच्या तुटल्या गाठी
भाजपचे ज्येष्ठ नेते दिवं. गोपीनाथ मुंढे यांचे जिल्ह्य़ाचे भाजपा नेते पांडुरंग फुंडकर यांच्याशी राजकीय व कौटुंबिक जिव्हाळ्याचे ऋणानुबंध. हे ऋणानुबंध चाळीस वर्षांंपासून कायम होते. अशाच एका सोहोळ्यात गोपीनाथ मुंडे व भाऊसाहेब फुंडकर.

एक हुंदका होय अनावर
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचा प्रसंग आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळातील खासदार स.गो. बरवे यांच्या अपघाती निधनातील साम्य वर्णन करून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गोिवद देशपांडे यांनी ग.दी. माडगुळकर यांनी त्यावेळी लिहिलेल्या चार ओळी मुंडेंच्या अपघाती निधनाशी कशा लागू होतात, हे सांगून तीव्र शोक व्यक्त केला आहे. आयएएस असलेले सनदी अधिकारी नोकरी सोडून खासदार झाले होते. आपल्या सत्कार सोहळ्याला जातांना त्यांचा असाच अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी ग.दी.माडगुळकरांनी पुढील चार ओळी लिहिल्या होत्या. ‘अजून आहे तिलक कपाळी, सत्काराच्या गळ्यात माळा, लोकमान्यता स्वीकाराचा अजून आहे, भरात सोहळा तोच काय हे घडे अचानक, चतन्याचे होय कलेवर लक्ष मुखातील जयनादाचा, एक हुंदका होय अनावर.’ गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतही वरील चार ओळी तंतोतत लागू पडतात.

भाजप कार्यकर्त्यांचे पितृछत्र हरपले -आ.सुधीर मुनगंटीवार
गोरगरीबांच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनायक गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचे पितृछत्र हरपले आहे. मुंडे यांनी लोकहितासाठी आयुष्यभर संघर्ष केला. महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे खोलवर रुजवण्यात गोपीनाथजींचा सिंहाचा वाटा होता. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात अनन्यसाधारण योगदान त्यांनी दिले. लोकहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षांतच गेले. त्यांच्या अथक परिश्रमातून १९९५ मध्ये राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तारूढ झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मिळालेल्या ऐतिहासिक विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कार्यकर्त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवणारा पितृतुल्य नेता राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी गमावला आहे. त्यांच्या निधनाने लोकहितासाठी सतत संघर्ष करणारा झंझावात थांबला आहे.

लोकनेता हरपला -खा. आनंदराव अडसूळ
महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांची जाण असलेला आणि प्रचंड लोकसंग्रह बाळगणारा लोकनेता आपल्यातून निघून गेला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने शिवसेना-भाजप महायुतीसह महाराष्ट्राचीही अपरिमित हानी झाली आहे. शिवसेना-भाजप युतीत सातत्याने समन्वयकाची भूमिका बजावणाऱ्या नेतृत्वाला आम्ही मुकलो आहोत. आपले आणि त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. विविध प्रश्नांच्या संदर्भात त्यांच्याशी संवाद होत होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे निकटचे संबंध होते. बाळासाहेब तर त्यांना मानसपुत्र मानत. उद्धव ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी सातत्याने चर्चा व्हायची. महाराष्ट्राच्या नशिबाने त्यांना ग्रामविकासासारखे महत्वाचे खाते मिळाले होते, पण नियतीला ते मान्य नव्हते.

त्यांच्या नेतृत्वाची गरज होती -आ. डॉ. अनिल बोंडे
त्यांच्याकडे ग्रामविकासाचे खाते आल्यानंतर त्यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. त्यांचा काम करण्याचा झपाटा राज्यातील जनतेने पाहिला होता. ओबीसी, बहुजन समाजाचे ते समर्थ नेते होते. येत्या काळात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच देशालाही त्यांच्या नेतृत्वाची गरज होती. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी सर्वासाठीच धक्कादायक आहे. महाराष्ट्र एका बलवान लोकनेत्याला मुकला आहे.

ग्रामीण जनतेचे नेतृत्व हरविले -खा.संजय धोत्रे
या घटनेने धक्का बसला असून महाराष्ट्र व भारतातील बहुजनांचा एक वरिष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. गोपीनाथ यांच्या निधनाने ग्रामीण जनता व ग्रामीण भागाचे नेतृत्व हरविले आहे. ते गरिबीतून संघर्ष करीत पुढे आले व त्यांनी राज्याच्या, तसेच देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले.ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून समस्त देशातील ग्रामीण लोकांचे जीवन विकसित व्हायला प्रारंभ होण्यापूर्वीच त्यांचा जीवनांत झाला, ही बाब केवळ भाजपाच नव्हे, तर साऱ्या महाराष्ट्राला धक्का देणारी आहे.

संघर्षशील नेतृत्व हरपले -खा. हंसराज अहीर
महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येऊन महाराष्ट्र आणि देशात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राचीच नाही, तर देशाची हानी झाली आहे. शेतकरी, शेतमजूर व ओबीसींच्या हितासाठी केलेला संघर्ष त्यांची कायम आठवण असणार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य कार्यकर्ता पोरका झाला आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून तर संघटन कार्याच्या बळावर युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. पक्षात बहुजन समाजाला सन्मानाचे स्थान प्राप्त करून देणारा बहुजनांचा नेता, अशी सन्माननीय बिरुदावली त्यांनी प्राप्त केली. असा संघर्षशील लोकनेता हरपल्याने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले.

गोरगरिबांची छाया व माया गेली -गुलाबराव गावंडे
जीवनात मी अनेक राजकीय नेते पाहिले, पण गोपीनाथजींमध्ये काही वेगळ्या गोष्टी दिसल्या. विशेषत: त्यांना समाजातील इतर मागासवर्गीयांबद्दल विशेष आस्था होती. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आग्रह धरीत असत. गोपीनाथजींच्या निधनाने गोरगरिबांची छाया व माया गेली आहे. आपल्या घरातलाच कोणी माणूस गेल्यासारखे साऱ्या महाराष्ट्राला वाटते.

भाजपाची बहुजन प्रतिमा संपली -आ.डॉ.रणजित पाटील
गोपीनाथजी मुंडे यांच्या रूपाने महाराष्ट्र व भाजपाला एक बहुजन अशी प्रतिमा मिळाली होती. ती त्यांच्या जाण्याने संपली आहे. त्यांना नुकतेच केंद्रात ग्रामीण विकास मंत्रालय मिळाले होते. त्याद्वारे ग्रामीण भागाचा विकास होणार, असे दिसत असतांनाच यश समोर असतांना ही दु:खद घटना घडली. भाजपाचे हे सर्व समाजाला एकवटणारे नेतृत्व देवाने हिरावले व सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा नेता गेला.

समर्थ नेतृत्व हरपले -शेतीतज्ज्ञ अरविंद नळकांडे
त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका बहुजन नेत्याला मुकला आहे. त्यांच्या नेतृत्वाची आज महाराष्ट्राला नितांत गरज होती. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण त्यांना होती म्हणूनच त्यांना ग्रामविकास खाते मिळाल्यानंतर ते या मंत्रालयाला खऱ्या अर्थाने न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. १९८० ते ८४ या काळात आपल्याला राज्य भाजप समितीचा सदस्य, या नात्याने त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांची चेहरेपट्टी त्या काळातील अभिनेते अजय सहानी यांच्यासारखी होती. त्यामुळे आपण आणि काही सहकारी त्यांना गमतीने अजय सहानी संबोधत होतो.

देश, राज्य व राजकारणाची हानी -खा. जाधव
गोपीनाथजी मुंडे यांच्या निधनाच्या वृत्तावर प्रथम विश्वासच बसला नाही. ईश्वर इतका निष्ठूर कसा असू शकतो, असा प्रश्न पडला. युतीची महायुती करण्याचे शिल्पकार गोपीनाथजी होते. युतीच्या महासमन्वयाची जबाबदारी त्यांनी अतिशय खुबीने पार पाडली. महाराष्ट्र महायुतीमय झाल्याचे आजचे जे चित्र आहे त्यात गोपीनाथजींचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्राचा असा सर्वश्रेष्ठ लोकनेता अचानक काळाच्या पडद्याआड जाणे, ही बाब अंत:करणात दु:खाचा डोंगर उभी करणारी आहे. मोदी सरकार व अच्छे दिन, असे वातावरण असतांना काळाने घात केला. गड आला, पण काही दिवसातच सिंह गेल्याने देशाचे, महाराष्ट्राचे व महायुतीचे अपरिमीत नुकसान झाले. ते कधीही भरून निघणार नाही.

मुंडेंसारखा मागासवर्गीयांचा नेता दृष्टीपथात नाही -अ‍ॅड.आंबेडकर
मुंडे यांच्या निधनाने इतर मागासवर्गीयांच्या उभरत्या राजकारणाला खीळ बसल्यासारखे झाले आहे. राज्यात आता त्यांच्यासारखा धाडसी नेता व त्यांच्यासारखा इतर मागासवर्गीयांचा नेता दृष्टीपथात नाही. अशा धाडसी नेत्याचे निधन मनाला धक्का लावून गेले. देशात व महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांचा नेता म्हणून गोपीनाथ यांचे नाव अग्रणी होते. त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटविला. कोणालाही अंगावर घेऊन राजकारण करण्याची गोपीनाथ मुंडे यांची तयारी असायची. अशा धाडसी नेत्याचे जाणे दु:खदायक आहे.

मैत्र जपणारा शक्तीशाली नेता -अजहर हुसेन
गोपीनाथ मुंडे हे ग्रामीण क्षेत्राशी जुळलेले एक शक्तीशाली नेते होते व मैत्री जपणारा व करणारा असा हा माणूस होता. इतर मागासवर्गीयांचा महाराष्ट्राचा हा नेता गेला, याचा आपणास धक्का बसला.

चांगला मार्गदर्शक नेता  गमावला -खा. कृपाल तुमाने
गोपीनाथ मुंडे महायुतीचे नेते असताना महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वामुळे मोठे यश मिळाले. ओबीसी समाजाचा एक मोठा नेता म्हणून त्यांची ओळख होती. समाजाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर मुंडे यांच्या निधनाने भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का आहे. महाराष्ट्राला त्यांच्याकडून अपेक्षा होती आणि त्या दृष्टीने ते कामाला लागले होते. आगामी विधानसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यासाठी महायुतीमधील नेते तयार झाले होते. ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतल्यावर त्यांची भेट घेतली. त्यावेळी रामटेकच्या विकासाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मुंडेंच्या निधनाने एक चांगला मार्गदर्शक, नेतृत्व व संघटन कौशल्य असणारा नेता गमावून बसलो आहे.

सामान्यांचे प्रश्न जाणणारा नेता -आ.डॉ.खुशाल बोपचे
गोपीनाथ मुंडेजींच्या निधनाने राज्य सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या दिलदार नेत्याला मुकला आहे. गोरगरीब कष्टकरी अशा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विधानसभा असो वा लोकसभेत वाचा फोडणाऱ्या ओबीसींचा एक मोठा नेताच्या जाण्याने राज्यातील बहुजन समाजाची झालेली हानी भरणे अशक्यप्राय आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता हा त्यांच्याच तालमीत तयार झाला असल्याने त्यांची कार्यशैली जवळून ओळखून असल्यामुळे आज गहिवरल्याशिवाय राहता येत नाही. त्यांच्या निधनाने निर्माण भाजपचेही मोठे नुकसान झाले आहे.       

झुंझार व दूरदृष्टीचा नेता गमावला -शिवाजीराव मोघे  
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त दूरदर्शनच्या वाहिन्यांवर पाहून जबर धक्का बसला. ते आपल्या कार्यकर्त्यांंच्या गळ्यातील मुकूटमणी होते. कार्यकर्त्यांंमध्ये त्यांच्याइतका लोकप्रिय नेता आपण पाहिला नाही. धडाडीने निर्णय घेऊन लोकमानसात सेवाभावी वृत्तीने जगणे, हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक झुंझार व दूरदृष्टीचा नेता गमावला आहे.

मित्रत्वाचे नाते जपणारा – माजी खा. विलास मुत्तेमवार
गोपीनाथ मुंडे भाजपाचे ज्येष्ठ नेते असले तरी तरी त्यांनी राजनितीच्या पलिकडे जाऊन विविध पक्षातील नेत्यांशी मैत्री जपली होती. २००९ मध्ये मुंडे राष्ट्रीय राजकारणात आले त्यावेळी त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे मराठवाडय़ातील सक्षम नेतृत्व होते आणि दोघांनी केंद्रात ते सिद्ध केले होते. केंद्रात मंत्री असताना त्यांची अनेकदा भेट होत असताना राज्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा होत असे. मुंडे केवळ भाजपाचे नेते नव्हते, तर राजकीय क्षेत्रात प्रत्येकाशी वेगळे नाते जपून ठेवणारा नेता होता. गेल्या काही वर्षांत त्यांच्याशी चांगली जवळीक निर्माण झाली होती. विकासाची दिशा असलेला आणि मित्रत्वाचे नाते जपणारा काळाच्या पडद्याआड गेला, याचे दुख आहे.  

महाराष्ट्राने मोठे नेतृत्व गमावले -महापौर अनिल सोले
भाजपचे राज्यातील संघटन मजबूत करण्यामागे गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. केवळ मराठवाडय़ातच नाही, तर महाराष्ट्रात त्यांनी लहान कार्यकत्यार्ंपासून तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शक्ती दिली होती. दिल्लीत भाजपचे सरकार आले असताना महाराष्ट्रात जो विजय मिळाला त्यात मुंडे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येणाऱ्या काळात प्रगती करीत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. भाजपाला आता चांगले दिवस आले असताना मुंडे यांच्या निधनाने मोठे नुकसान झाले आहे.

मोठा शेतकरी नेता हरपला -नाना पटोले
गोपीनाथ मुंडेजींच्या निधनाने राज्य एका मोठय़ा झुंजार शेतकरी नेत्याला मुकला आहे. यासह भाजपनेही एक तळागाळातून येऊन राज्य व देशात मोठा झालेला एक उत्तम नेतृत्व हरपला आहे. लढवय्या बाण्याचे मुंडेजींच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.   

महाराष्ट्राचा संघर्षयात्री गेला -फुंडकर
भाजपचे ज्येष्ठ नेते व लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या अकाली निधनाने देश, महाराष्ट्र व महायुतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आपली वैयक्तिक व कौटुंबिक हानी झाली आहे. आपले व मुंडे यांचे चाळीस वर्षांंचे ऋणानुबंध होते. त्यांनी आपल्यावर अपार प्रेम केले. पक्षासोबत राजकीय जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते नेहमी सुखदु:खात धावून आले. त्यांच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली. कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

धडाडीच्या नेत्यास मुकलो -ज्येष्ठ नेते रणजित देशमुख
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मात निधनाच्या बातमीने धक्काच बसला. बातमीवर विश्वास बसला नव्हता. १९८५ मध्ये दोघेही आमदार झालो होतो. मंत्री असताना ते नेहमीच काम घेऊन येत असत. त्यामुळे कदाचित आमच्यात आत्मियता निर्माण झाली. आज व्यक्तीश एका चांगल्या दमदार मित्राला मुकलो आहे. मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी झाली आहे. एका कणखर व धडाडीच्या नेत्यास मुकलो.  

मुंडे म्हणजे झंझावात -खा. भावना गवळी
गोपीनाथ मुंडे म्हणजे एक झंझावात होते. जनसेवेचे त्यांनी घेतलेले व्रत अंधतेने घेतलेले नव्हते. राष्ट्रविकासाचे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्या पूर्तीसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले. एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार आणि केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री, असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्या निधनाने राष्ट्राची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही.