दुबई येथे लाखोंचा अपहार करून बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आलेल्या रईस अहमद फकीरमियाँ मुकादम या संशयिताला रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्याच्या विरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबतची माहिती अशी-रईस अहमद फकीरमियाँ मुकादम (रा. एमआयडीसी, मिरजोळे, जि. रत्नागिरी) याने दुबई येथे एका कंपनीत मोठय़ा रकमेचा अपहार करून बनावट पासपोर्टच्या आधारे तो भारतात आला आहे, अशी खबर पोलीस अधीक्षक दीपक पांडे यांना मिळाली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपअधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. बाजीराव पाटील, सहा. पो. नि. रामचंद्र कुंदळे, उपनिरीक्षक मानसिंग पाटील व मामा कदम यांनी चौकशी सुरू केली. या चौकशीत रईस अहमद मुकादम हा दुबई येथे ‘सुपर इलेक्ट्रिकल्स, लायटिंग कंपनी’मध्ये कामाला होता. या कंपनीत त्याने मोठय़ा रकमेचा अपहार केल्याचे कंपनीचे मालक सईद सैफ यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी मुकादम याचा मूळ पासपोर्ट आपल्याकडे ठेवून घेतला. त्यामुळे मुकादम याने आपला मित्र मोहिद्दीन हसनवार (रा. कासारकोंड, केरळ) याच्या मदतीने बनावट पासपोर्ट तयार करून घेतला व तो त्याआधारे ३ फेब्रुवारी २०१२ रोजी भारतात परत आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
रईस याने १९९९ साली परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट (नं. बीओ-९४३८९६) प्राप्त करून त्याआधारे तो २००८ मध्ये नोकरीनिमित्त दुबई येथे गेला होता. मात्र या पासपोर्टची मुदत संपल्याने त्याने दुबई येथे नवीन पासपोर्ट (नं. एच-६०८९४९८) काढून त्याआधारे तो २९ एप्रिल २०११ रोजी दुबई येथून निघून ३० एप्रिल ११ रोजी छ. शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आला होता. त्यानंतर तो १८ मे ११ रोजी मुंबई येथून परदेशात जाण्यासाठी गेला होता. परंतु तो कोणत्या देशात गेला तसेच तो कोणत्या देशातून पुन्हा भारतात परत आला, याबाबतची कोणतीही नोंद त्याच्या पासपोर्टवर करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याने बनावट पासपोर्ट खरा असल्याचे भासवून तो भारतात परत आलेला आहे, असे पोलिसांनी सांगून रईस अहमद फकीरमियाँ मुकादम याला चौकशीअंती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.