फौजिया खान यांचे मंत्रिपद नव्या फेरबदलातही कायम राहिले. त्यामुळे खान यांना मंत्रिपदावरून डिच्चू मिळणार असल्याची चर्चा पसरविण्यामागे वरिष्ठ पातळीवरील पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारणच कारणीभूत होते, हे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून खान यांचे मंत्रिपद जाणार असल्याची हूल पक्षातल्याच एका गटाने वरिष्ठ पातळीवर जाणीवपूर्वक निर्माण केली, हेही आता दिसू लागले आहे.
फौजिया खान यांना राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कारणे दाखवा नोटीस बजावली. पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांच्याविरोधात काम करून शिवसेनेला मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. या निमित्ताने खान यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केले. दुर्राणी यांचे प्रयत्न सुरू असतानाच पक्षातूनच खान यांना डिच्चू मिळणार असल्याची चर्चा हळूहळू पसरली. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात आपण काम केले नाही. मात्र, आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. दुर्राणी यांनी मंत्रिपदासाठी रचलेले हे कटकारस्थान आहे, असा खुलासा खान यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांकडे केला होता.
दरम्यान, दुर्राणी यांना मंत्रिपद मिळावे, या साठी त्यांचे समर्थक शिष्टमंडळ पवारांसह अन्य नेत्यांनाही नुकतेच भेटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्राणी यांना मंत्रिपद देण्यास पक्षाने असमर्थता दाखवली. सध्या पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतर अवघ्या दोन-अडीच महिन्यांत पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे एवढय़ा अल्प काळासाठी मंत्रिपद देणे संयुक्तीक नाही, असे सांगून पक्षाकडून शिष्टमंडळाची बोळवण करण्यात आली. खान या अल्पसंख्य असल्याने त्यांच्या जागी दुर्राणी यांचा फेरबदलात विचार होणार, असे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका गोटात गेल्या १५ दिवसांपासून बोलले जात होते. प्रत्यक्षात खान यांना पक्षाने मंत्रिपदी कायम ठेवले आहे.
मार्च महिन्यात खान यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपली आहे. पुढील सहा महिने या पदावर त्या राहू शकतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत खान यांचे मंत्रिपद अबाधित राहणार आहे. सप्टेंबरअखेपर्यंत खान तांत्रिकदृष्टय़ा मंत्रिपदावर राहू शकतात व नंतर विधानसभा निवडणुकीचीच आचारसंहिता लागत असल्याने खान या आपोआपच आघाडी सरकारमध्ये शेवटपर्यंत मंत्री राहणार आहेत.
जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिपदी वर्णी लागणार व फौजिया खान यांना डिच्चू मिळणार, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून होत होती. विजयकुमार गावीत यांच्या जागी आव्हाड यांची वर्णी लागली. मात्र, खान यांच्या कथित ‘डिच्चू’ची चर्चा खोटी ठरली. श्रीमती खान यांना नोटीस बजावून जाणीवपूर्वक त्यांच्या गच्छंतीची चर्चा पेरण्यामागे पक्षातलाच एक गट वरिष्ठ पातळीवरून कार्यरत होता, हे मात्र या निमित्ताने स्पष्ट झाले. दोन वेळा विधान परिषद सदस्यत्वाची संधी मिळालेल्या खान यांना पक्षाने अल्पसंख्य व उच्चशिक्षित महिला या निकषावर मंत्रिपद दिले होते. राज्यातील लोकसभेच्या पराभवानंतर खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांनी पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. पक्षातल्या बारीक-सारीक घटना-घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या पवारांचाच शब्द राष्ट्रवादीत अंतिम असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.