येथील सुपुत्र सागर तुकाराम बांदेकर यांची दिल्लीच्या दबंग प्रो. कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. येत्या २५ जून रोजी होणाऱ्या प्रो कबड्डी स्पर्धेत दबंग दिल्ली संघ सहभागी झाला आहे.
या संघाचा सराव पनवेल येथील रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व केलेल्या सागर बांदेकर यांच्या निवडीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी असलेला सागर बांदेकर हा शिवभवानी कला क्रीडा मंडळाचा खेळाडू आहे. सिंधुदुर्ग कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळणाऱ्या सागर बांदेकर यांना मुंबईतील महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत नोकरीची संधी मिळाली होती.
सागर बांदेकर याने महाराष्ट्र संघासह भारतीय संघासाठीही मोलाची कामगिरी बजावली होती. या त्याच्या कामगिरीची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
दिल्लीच्या दबंग संघात काशिलिंग आडके, डी. सुरेश, डी. गोपू, प्रशांत चव्हाण, दीपक नारवल, प्रशांत राय, शेल्लामनी, भूपेंद्र सिंग, सचिन शिंगाडे, सिराज शेख या खेळाडूंचा समावेश आहे. कबड्डी क्षेत्रात सागर बांदेकर यांचे नाव आहे. त्यामुळे दबंग दिल्ली संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याने जिल्ह्य़ात आनंद व्यक्त होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 12:17 am