सायेब, पावसानं दगा दिला… भुईमुग, तूर जळाली… समदे इचारून जातेत पण कायच उपयोग नाय होत. तुम्ही तर आला बी अन चालला बी. आम्हाला लवकर मदत द्या, अशी हात जोडून विनवणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकापुढे केली. सोलापूरमधल्या मंगळवेढा तालुक्यातील अंधळगावचे शेतकरी सदाशिव वेळापुरे यांनी ही आर्त विनवणी सरकारकडे केली आहे.

राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांचे पथक राज्यभर दौरे करीत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी गावांची पाहणी केली. या पथकाने बुधवारी संध्याकाली जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जातेगाव, बित्रगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील किसन वारे या शेतकऱ्याने कापसाचे नुकसान झाले आहे. तूर, लिंब आदी पिकं जळाली असल्याची तक्रार यावेळी पथकापुढे केली. जनवारांच्या चाऱ्याचा तसेच पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली.

यानंतर हे पथक बुधवारी रात्री पंढरपूर येथे मुक्कमी आले. गुरवारी सकाळी सात वाजता पुन्हा या दौऱ्याला सुरवात झाली. सकाळी पावणे आठ वाजता मंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव येथे हे पथक पोहचले. यावेळी शेतातील पिके, विहीरी यांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. इथेही शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा आणि पाण्याची मागणी केली. पुढे या पथकाने सांगोला जिल्ह्यातील राजापूर येथे भेट दिली. येथील शेतकरी मधुकर तोडकरे यांच्या शेतीची पाहणी केली तसेच यशवंत पुजारी यांच्या विहिरीची पाहणी केली. विहिरीत टँकरने पाणी सोडत असल्याचे पुजारी यांनी सांगितले. यावेळी तालुक्याचे जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी दुष्काळाबाबतची परिस्थिती आणि उपाययोजना पथकापुढे मांडल्या.

बुधवारी ४ तास आणि गुरुवारी ३ तासाचा धावता दौरा करून केंद्रीय पथकाने शासकीय सोपस्कार पूर्ण केला. त्यानंतर निसर्गाने दगा दिला आता मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या पदरात काय टाकणार याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत.

नरेगाच्या कामाची केली पाहणी : विभागीय आयुक्त

सोलापूर जिल्ह्यातील बुधवारी ३ गावे तर गुरुवारी २ गावांची पाहणी केली. यामध्ये शेतातील पिकांचे झालेले नुकसान, जळालेली पिके याची पाहणी पथकाने केली. याशिवाय थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले. प्रामुख्याने जनावरांचा चार, पिण्याचे पाणी या बरोबरीने काही मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यावेळी पथकाने नरेगाच्या कामाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, असे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी माहिती दिली.

ते आले… त्यांनी पाहिलं… अन ते गेले…

राज्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणीसाठी केंद्राचे पथक राज्याच्या विविध गावांना भेटी देत आहेत. या पथकात संचालक, उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच कमी वेळात जास्त गावांना भेटी देवून परिस्थितीचा आढावा हे पथक घेणार आहेत. त्यामुळे त्यांचा दौरा म्हणजे ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रमाची रूपरेषा होती. सोलापूर जिल्ह्यात बुधवारी अवघ्या ४ तासांत ३ गावे. यामध्ये शेतीची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद, शासकीय माहिती घेण्यात आली. तर गुरुवारी सकाळी ७ वाजता दौरा सुरु झाला आणि १० वाजता हा दौरा सांगली जिल्ह्याकडे रवाना झाला. त्यामुळे ते आले… त्यांनी पाहिलं… अन् ते गेले… असाच काही अर्थ शेतकरी काढत आहेत.