नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १८ जागांसाठी ८३ उमेदवारांनी १४६ अर्ज दाखल केले. खा. दिलीप गांधी-सुवालाल गुंदेचाप्रणीत सहकार पॅनेलने मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. जनसेवा पॅनेलच्या उर्वरित उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. उद्या (बुधवार) अर्जाची छाननी होणार आहे.
इच्छुकांनी तब्बल ३४० अर्ज नेले होते. मात्र त्यातील निम्म्याहून कमी जणांनी उमेदवारी दाखल केली. अखेरच्या दिवशी १०० जणांनी उमेदवारी दाखल केली. अर्ज दाखल केल्यानंतर गांधी व गुंदेचा यांच्या नेतृत्वाखाली सहकारच्या उमेदवारांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली व टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मेळावा घेण्यात आला. तेथे गांधी यांनी सहकारचे उमेदवार जाहीर केले. विरोधी जनसेवा पॅनेलने मात्र अद्यापि आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार असे- दिलीप गांधी, सुवालाल गुंदेचा, संजय लुणिया, शैलेश मुनोत, अनिल कोठारी, किशोर बोरा, राजेंद्र अग्रवाल, केदार केसकर, मनीष साठे, अजय बोरा, साधना भंडारी (सर्व शहर), दिनेश कटारिया (गुजरात, महाराष्ट्रबाहेरील मतदारसंघ), विजय मंडलेचा (पाथर्डी), मीना राठी (श्रीरामपूर), नवनीत सुरपुरिया (सोनई), राधावल्लभ कासट (संगमनेर), अशोक कटारिया (पारनेर) व दीपक गांधी. खा. गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी व गुंदेचा यांचे चिरंजीव मनोज गुंदेचा यांनी अर्ज दाखल केला असला तरी पॅनेलमध्ये दोघांची नावे नाहीत.
याशिवाय जनसेवा पॅनेलचे डॉ. पारस कोठारी, रमेश भळगट, वसंत लोढा, रसिक कोठारी, सुभाष भंडारी, राजेंद्र पिपाडा, लता लोढा आदींनीही अर्ज दाखल केले आहेत.
शहर मतदारसंघातील सर्वसाधारण १० जागांसाठी ३७ उमेदवारांनी ६७ अर्ज, शहरातून महिलेच्या एका जागेसाठी ४ जणींचे ९ अर्ज, राज्याबाहेरील मतदारसंघातील एका जागेसाठी तीन जणांचे ५, शाखा मतदारसंघातून (उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघ) सर्वसाधारणच्या ४ जागांसाठी ३० जणांचे ४८, शहरातील अनुसूचित जातिजमाती मतदारसंघातील एका जागेसाठी ४ जणांचे ९ अर्ज दाखल झाल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी एम. जी. गायकवाड यांनी दिली.
खा. गांधींची विरोधकांवर टीका
अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या मेळाव्यात बोलताना खा. गांधी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. व्यक्तिद्वेषातून प्रेरित झालेल्यांनी बँकेला सातत्याने बदनाम करण्याचे काम केले. आपण जे केले ते बँकेच्या चांगल्यासाठीच केले, परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे कसे करणार? बँकेचा सेवक हीच आपली निष्ठा आहे. सभासदांच्या विश्वासामुळेच विरोधकांना थारा मिळाला नाही. या वेळी बोलताना गांधी यांनी मल्टिस्टेट झाल्यानंतर सभासदांना १८ टक्के लाभांश दिल्याचा दावा केला व पुन्हा सहकार पॅनेल सत्तारूढ झाल्यास २० टक्के लाभांश, देशभर एटीएम सेवा सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पॅनेलच्या मिरवणुकीत काही वेळ पारनेरचे शिवसेनेचे आमदार विजय औटीही सहभागी झाले होते.