घरची हलाखीची स्थिती, फिरस्ते जीवन या साऱ्यावर मात करत त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतले, शिक्षणशास्त्रातील पदवीही घेतली, लेखनाची आवड म्हणून कथा-कादंबरी आकारास येऊ लागल्या, यातीलच एक साहित्यकृती ‘फेसाटी’ला साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला.. पण या साऱ्या यशोगाथेनंतरही तो आज दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करत आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहे. ही कथा आणि व्यथा आहे ‘फेसाटी’कार नवनाथ गोरे याची!

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आणि जत तालुक्यातील उमदीजवळच्या निगडी खुर्दमधील युवक नवनाथ गोरे हे नाव अनेकांच्या परिचयाचे झाले. संघर्षमय जीवन जगतानाच त्याने लिहिलेल्या ‘फेसाटी’ कादंबरीमुळे तो प्रसिद्धीस आला. या पुरस्कारानंतर त्याचे जागोजागी सत्कार, कौतुकसोहळे झाले.   हे सुरू असताना त्याची आणि त्याच्या कुटुंबाच्या संघर्षांची दखल घेत मदतीची आश्वासने दिली गेली. परंतु हे सत्काराचे दिवस सरले तशी ही आश्वासनेही हवेत विरली आणि नवनाथचे जीवन पुन्हा पहिल्यासारखे सुरू झाले.

थोडी धडपड केल्यावर एका माजी मंत्र्यांनी त्यांच्या संस्थेत हंगामी शिक्षकाची नोकरी दिली. अवघ्या दहा हजार रुपये पगारावर नवनाथ इथे रुजूही झाला. पण तेवढय़ात करोना अवतरला आणि त्याच्या आयुष्याची दिशा पुन्हा बदलली. करोना संसर्गामुळे शाळाच बंद झाल्या. हंगामी शिक्षकांच्या तर नोक ऱ्याच धोक्यात आल्या. गावी आलेल्या नवनाथने पुन्हा रुजू होण्यासाठी संबंधित संस्थेकडे चौकशी केल्यावर आता नोकरी हवी असेल तर केवळ तीन हजार रुपये मानधनावर काम करावे लागेल असे कळवले. दहा हजारातच जगणे अवघड असताना हा नवा प्रस्ताव स्वीकारणे तर खूपच अवघड होते. शेवटी त्याने गावी राहतच शेतात मोलमजुरी करण्यास सुरुवात केली आहे.

नवनाथच्या घरी त्याची आई आणि एक अपंग भाऊ आहे. वडिलांचे नुकतेच निधन झाल्याने घर चालवण्याची सर्व जबाबदारी त्याच्यावर आहे. पदव्युत्तर शिक्षण, शिक्षणशास्त्रातील पदवी आणि लेखनासाठी मिळालेला ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार, असे बरेच काही गाठीशी असूनही त्याला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सध्या तो शेतात मोलमजुरीची कामे करत आहे आणि या जीवनसंघर्षांतच त्याच्यातील लेखकही जागवत आहे.