कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे आयोजित कुसुमाग्रज साहित्य दर्शन कार्यक्रमात कुसुमाग्रजांच्या काव्य व नाटकांचे ओझरते दर्शन घडविण्यात आले.
माणसातील माणूस पाहणाऱ्या कुसुमाग्रजांनी आपल्या कविता, कथा, गाणे, नाटकांमधून केवळ माणूसच नाही तर निसर्गाशी, आपल्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवली. कुसुमाग्रज साहित्य दर्शन कार्यक्रमात त्यांच्या कलाविष्काराची झलक सादर करताना कवी किशोर पाठक, सदानंद जोशी, हेमा जोशी, शुभांजली पाडेकर, कन्याकुमारी गुणे यांनी कुसुमाग्रजांची, माझ्या मातीचे गायन, वेडात मराठे वीर दौडले सात, चार होत्या पक्षिणी, हे सुरांनो चंद्र व्हा, उठा उठा चिऊताई यांसारखी निवडक लोकप्रिय गाणी, बुद्धाची मूर्ती ही कथा आणि कणा, गाभारा, अखेर कमाई अशा निवडक कवितांचे सादरीकरण केले.
याशिवाय नटसम्राट नाटकातील नाटय़ प्रवेशाची झलक दाखविण्यात आली. या संपूर्ण सादरीकरणाला नवीन तांबट व रागेश्री धुमाळ यांनी साथ केली. दरम्यान, मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे नारायण सुर्वे वाचनालयाला ५२ कथासंग्रह भेट देण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव प्रकाश अतकरे यांनी ही पुस्तके वाचनालयाचे विश्वस्त व ग्रंथपाल यांच्याकडे सुपूर्द केली. कुसुमाग्रज अध्यासन स्थापनेचा उद्देश विशद करताना डॉ. अतकरे यांनी मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे, काव्य, नाटय़ आणि ललित साहित्याच्या क्षेत्रातील सर्जनशील प्रतिभावंतांचा यथोचित गौरव करणे, संबंधित सेवा पुरविणे ही अध्यासनाची उद्दिष्टे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अध्यासनाचे समन्वयक शाम पाडेकर व कवी किशोर पाठक यांनी केले.