16 December 2017

News Flash

साहित्य संमेलनाला राजकीय ग्रहण!

चिपळूण येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्याचे वादग्रस्त जलसंपदामंत्री सुनील तटकरे

खास प्रतिनिधी , रत्नागिरी | Updated: November 14, 2012 4:18 AM

चिपळूण येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्याचे वादग्रस्त जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा जाहीर केला आहे.
चिपळूण नगर परिषदेतील शिवसेनेचे गटनेते राजू देवळेकर यांनी मंगळवारी या मुद्दय़ावर खास पत्रकार परिषद घेऊन तोफ डागली. घरातील मंगलकार्याला आपण बाहेरची व्यक्ती यजमान म्हणून आणतो का, असा सवाल करून ते म्हणाले की, चिपळूणमध्ये पालकमंत्री भास्कर जाधव, खासदार हुसेन दलवाई, आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार नाना जोशी यांसारखी स्वागताध्यक्षाची जबाबदारी समर्थपणे पेलू शकणारी माणसे असताना शेजारच्या रायगड जिल्ह्य़ातील मंत्री तटकरे यांची निवड न पटणारी आहे. संमेलनाच्या नावाखाली राष्ट्रवादीची छावणी उघडण्याचा डाव यामागे दिसत आहे. या निवडीला आमचा तीव्र विरोध आहे. संमेलनाच्या संयोजन समितीने स्थानिक जनतेच्या भावनांची योग्य दखल न घेतल्यास शिवसेनेच्या पद्धतीने वेगळा विचार केला जाईल. देवळेकर पुढे म्हणाले की, नगर परिषदेने या संमेलनासाठी १० लाख रुपये देण्याचा निर्णय केला आहे, पण या प्रयत्नांची दखल न घेता आणि स्वागत समितीच्या सदस्यांनाही विश्वासात न घेता काहीजणांनी घेतलेला हा निर्णय आक्षेपार्ह आहे.
दरम्यान या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही स्थानिक पातळीवर दोन गट पडले असून पालकमंत्री जाधव आणि चिपळूण नगर परिषदेवर वर्चस्व असलेले माजी आमदार रमेश कदम परस्परांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळेच जाधव यांना बाजूला ठेवून कदम यांनी तटकरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यास संयोजन समितीला सुचवले, असे मानले जाते. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मैदानासह विविध सुविधांबाबत नगर परिषदेचे सहकार्य आवश्यक असल्यामुळे संयोजन समितीने कदम यांची सूचना स्वीकारली, असा अंदाज आहे. गेल्या २ ऑक्टोबर रोजी चिपळूण येथे क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी तटकरे आले होते. तेव्हापासून याबाबतच्या प्रक्रियेला गती आली; तटकरे यांनी संयोजन समितीच्या सदस्यांना दुसऱ्या दिवशी कोयनानगर येथे पाचारण करून भरघोस निधीची हमी दिली आणि स्वागताध्यक्षाची जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली, असे समजते.

First Published on November 14, 2012 4:18 am

Web Title: sahitya sammelan shiv sena against of sunil tatkare